*उमरगा बसस्थानक पाडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था का केली नाही?*
*प्रवाशांचे हाल थांबवण्यासाठी तात्काळ सुविधा उपलब्ध करण्याची मागणी – ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे आगारप्रमुखांना निवेदन*
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा शहरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवाशांचे दैनंदिन जीवनाशी जोडलेले महत्त्वाचे केंद्र असलेल्या उमरगा बसस्थानकाची इमारत कोणतीही सक्षम पर्यायी व्यवस्था न करता पाडण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचा आरोप करत ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उमरगा आगारप्रमुखांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाही, डोक्यावर सावली नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था नाही, तसेच बस कुठे लागणार याबाबत स्पष्ट दिशादर्शक फलकही उपलब्ध नाहीत. परिणामी महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि रुग्णांना अत्यंत अमानुष परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे.
फाउंडेशनने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत “आधी पाडकाम आणि नंतर विचार” अशा बेजबाबदार पद्धतीने काम सुरू करण्यात आल्याचा आरोप केला आहे. कोणतेही मोठे सार्वजनिक बांधकाम सुरू करण्यापूर्वी नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असताना उमरगा बसस्थानकाच्या बाबतीत ही जबाबदारी पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उमरगा हे सीमावर्ती आणि ग्रामीण भागाशी जोडलेले महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे येथे दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी, रुग्ण उपचारासाठी, शेतकरी बाजारपेठेसाठी आणि कामगार रोजगारासाठी एसटी बससेवेवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत बसस्थानकासारख्या मूलभूत सार्वजनिक सुविधेबाबत इतकी निष्काळजी भूमिका घेणे अत्यंत गंभीर आणि संतापजनक असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.
यावेळी फाउंडेशनच्या वतीने काही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. पर्यायी निवारा, बसण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसताना बसस्थानक पाडण्याची परवानगी कोणी दिली? प्रवाशांच्या सुरक्षिततेचा, उन्हाळ्याचा आणि आगामी पावसाळ्याचा विचार प्रशासनाने का केला नाही? तात्पुरत्या बसस्थानकाची किंवा शेडची उभारणी का करण्यात आली नाही? बस कुठे लागतील आणि प्रवाशांनी कुठे थांबावे याबाबत शिस्तबद्ध व्यवस्था का करण्यात आली नाही? तसेच संपूर्ण कामाचे नियोजन आणि देखरेख नेमकी कोण करत आहे? असे सवाल उपस्थित करण्यात आले.
फाउंडेशनने प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजनांची मागणी करत बसस्थानक परिसरात मोठे तात्पुरते शेड उभारणे, बाके व खुर्च्यांची व्यवस्था करणे, महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा व्यवस्था उपलब्ध करणे, थंड पिण्याच्या पाण्याची व वॉटर एटीएमची सुविधा सुरू करणे, स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला व विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा निर्माण करणे, कामाचा कालावधी आणि पर्यायी व्यवस्थेबाबत सार्वजनिक माहिती फलक उभारणे, तसेच संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हा प्रश्न सामान्य नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाशी संबंधित असून प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर सत्यनारायण जाधव, व्यंकट ऊर्फ राजू भालेराव, ऍड. ख्वाजा शेख, किशोर औरादे, करीम शेख, ऍड. अर्चना जाधव, प्रदीप चौधरी, ज्योती माने, धानय्या स्वामी, शबाना उडचणे, राजू बटगीरे, प्रदीप मोरे, किशोर बसगुंडे, संतोष चव्हाण आणि कविता साळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.






