*”ऍड. शीतल चव्हाण यांच्या पोस्ट आणि निवेदनाचा प्रसार माध्यमातून प्रसिद्ध बातमीचा इम्पॅक्ट”*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
*उमरगा शहरातील अस्वच्छतेवर नगर परिषदेकडून तातडीची कारवाई; कसगी-तुरोरी उपोषणात आमदार प्रवीण स्वामींची मध्यस्थी*
उमरगा शहरातील डुकरे, कचरा, साचलेले पाणी, गटारींची दयनीय अवस्था आणि वाढती अस्वच्छता याबाबत ऍड. शीतल शामराव चव्हाण यांनी दि. २० मे २०२६ रोजी प्रत्यक्ष पाहणी करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि नगर परिषदेला निवेदन देत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या पोस्ट आणि निवेदनाची दखल घेत नगराध्यक्ष मा. किरण गायकवाड यांनी तत्काळ हालचाली सुरू करत स्वच्छता विभागाला आवश्यक सूचना दिल्या असून शहरातील स्वच्छतेबाबत उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ऍड. शीतल चव्हाण यांनी या कारवाईचे स्वागत करत नगराध्यक्ष किरण गायकवाड यांचे सार्वजनिकरित्या अभिनंदन आणि आभार मानले आहेत. मात्र, केवळ कौतुकावर न थांबता त्यांनी “हातचा राखत” अजूनही प्रलंबित असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गोंधळ, कपात आणि पारदर्शकतेच्या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले आहे.
दि. ०९ मार्च २०२६ रोजीच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रक्रियेत पारदर्शकता आणावी, पीएफ कपातींची स्पष्टता करावी आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन नगर परिषदेला देण्यात आले होते. शहरातील स्वच्छतेबाबत जशी तत्परता दाखवली गेली, तशीच संवेदनशीलता आणि गती आता स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नातदेखील दिसून यावी, अशी अपेक्षा ऍड. चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, कसगी आणि तुरोरी येथे सुरू असलेल्या उपोषणांबाबत तसेच त्या आंदोलनांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबतही ऍड. शीतल चव्हाण यांनी दि. २२ मे रोजी सोशल मीडियातून प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आमदार मा. प्रवीण स्वामी यांनी तत्परतेने दखल घेत दोन्ही आंदोलनांमध्ये मध्यस्थी करत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आणि प्रश्नांवर न्याय्य तोडगा काढत उपोषणे मागे घेण्यास भाग पाडले. तसेच भुयार चिंचोली येथील शेतरस्त्याचा वादही त्यांनी मिटवला.
या घडामोडींनंतर ऍड. शीतल चव्हाण यांनी “चांगल्या कामांचे स्वागत झाले पाहिजे” अशी भूमिका घेत आमदार प्रवीण स्वामी आणि नगराध्यक्ष किरण गायकवाड या दोघांचेही अभिनंदन केले आहे. त्याचवेळी, लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांबाबत अशीच संवेदनशीलता आणि तत्परता सातत्याने दाखवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.






