Best News Portal Development Company In India

सार्वजनिक जागा वाचवण्यासाठी ६ जुलै रोजी तुळजापूर नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण!

सार्वजनिक जागा वाचवण्यासाठी ६ जुलै रोजी तुळजापूर नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण!
​सिटी सर्वे क्र. ९७२ मधील घोटाळ्याचा आरोप; बांधकाम परवाना रद्द करण्याची जवाहर गल्लीतील नागरिकांची मागणी!
​तुळजापूर प्रतिनिधी:- तुळजापूर शहरातील जवाहर गल्लीतील नागरिकांच्या वतीने आणि माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ६ जुलै २०२६ रोजी तुळजापूर नगरपरिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. शहरातील एका महत्त्वाच्या सार्वजनिक जागेवरील कथित बेकायदेशीर बांधकाम आणि प्रशासकीय हलगर्जीपणाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील सिटी सर्वे क्र. ९७२ मधील एकूण २३६४.३० चौ.मी. जागेपैकी ७३१ चौ.मी. जागा भाजी मंडई व इतर सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार, ३० नोव्हेंबर १९७८ रोजी या जागेचे कायदेशीररित्या भूसंपादन करण्यात आले होते आणि त्याचा मोबदलाही संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला होता.
​त्यानंतर या जागेवर महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले असून, उर्वरित जागा भाजी मंडईसाठी सार्वजनिक वापरात होती.
​अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दिशाभूल केल्याचा आरोप.
​”नगर रचनाकार धाराशिव यांच्या वारंवार पत्रव्यवहारानंतरही, नगरपरिषदेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणीवपूर्वक लपवून प्रशासनाची दिशाभूल केली आहे,” असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
​जागेचे भूसंपादन होऊन ती पंचांच्या हस्ते नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली असतानाही, संबंधित जागेवर मूळ मालकास बेकायदेशीरपणे बांधकाम परवानगी देण्यात आली. त्या ठिकाणी आता व्यापारी संकुल व लॉजिंग उभारण्यात आले आहे. वास्तविक पाहता, या जागेची कायदेशीर मालक नगरपरिषद असल्याचे स्पष्ट कागदपत्रे उपलब्ध असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
​नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी व नगर अभियंता यांनी कागदपत्रांची पडताळणी न करता दिलेली बांधकाम परवानगी त्वरित रद्द करण्यात यावी.
​या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.
​सिटी सर्वे क्र. ९७२ पैकी ‘ती’ ७३१ चौ.मी. जागा नगरपरिषदेने पुन्हा ताब्यात घेऊन नागरिकांच्या सार्वजनिक उपयोगासाठी खुली करावी.
​सध्या नागरिक विचारणा करत असताना, संबंधित अधिकारी भूसंपादनाची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे किंवा सापडत नसल्याचे सांगून वेळ मारून नेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
​या संदर्भातील लाक्षणिक उपोषणाचे रीतसर निवेदन २९ जून २०२६ रोजीच मुख्याधिकारी, नगरपरिषद तुळजापूर यांना देण्यात आले आहे. हे निवेदन देतेवेळी जयकुमार नागनाथ पांढरे, अमरीश भैय्या जाधव, शहाजी काका भांजी व विकास शिंदे उपस्थित होते.
​”जनतेच्या सार्वजनिक हक्काची जागा वाचवा – नागरिकांचा हक्क अबाधित ठेवा,” अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. या आंदोलनात जवाहर गल्लीतील सर्व नागरिक, आजी-माजी नगरसेवक तसेच तुळजापुरातील जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india