सार्वजनिक जागा वाचवण्यासाठी ६ जुलै रोजी तुळजापूर नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण!
सिटी सर्वे क्र. ९७२ मधील घोटाळ्याचा आरोप; बांधकाम परवाना रद्द करण्याची जवाहर गल्लीतील नागरिकांची मागणी!
तुळजापूर प्रतिनिधी:- तुळजापूर शहरातील जवाहर गल्लीतील नागरिकांच्या वतीने आणि माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ६ जुलै २०२६ रोजी तुळजापूर नगरपरिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. शहरातील एका महत्त्वाच्या सार्वजनिक जागेवरील कथित बेकायदेशीर बांधकाम आणि प्रशासकीय हलगर्जीपणाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील सिटी सर्वे क्र. ९७२ मधील एकूण २३६४.३० चौ.मी. जागेपैकी ७३१ चौ.मी. जागा भाजी मंडई व इतर सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार, ३० नोव्हेंबर १९७८ रोजी या जागेचे कायदेशीररित्या भूसंपादन करण्यात आले होते आणि त्याचा मोबदलाही संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला होता.
त्यानंतर या जागेवर महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले असून, उर्वरित जागा भाजी मंडईसाठी सार्वजनिक वापरात होती.
अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दिशाभूल केल्याचा आरोप.
”नगर रचनाकार धाराशिव यांच्या वारंवार पत्रव्यवहारानंतरही, नगरपरिषदेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणीवपूर्वक लपवून प्रशासनाची दिशाभूल केली आहे,” असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
जागेचे भूसंपादन होऊन ती पंचांच्या हस्ते नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली असतानाही, संबंधित जागेवर मूळ मालकास बेकायदेशीरपणे बांधकाम परवानगी देण्यात आली. त्या ठिकाणी आता व्यापारी संकुल व लॉजिंग उभारण्यात आले आहे. वास्तविक पाहता, या जागेची कायदेशीर मालक नगरपरिषद असल्याचे स्पष्ट कागदपत्रे उपलब्ध असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी व नगर अभियंता यांनी कागदपत्रांची पडताळणी न करता दिलेली बांधकाम परवानगी त्वरित रद्द करण्यात यावी.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.
सिटी सर्वे क्र. ९७२ पैकी ‘ती’ ७३१ चौ.मी. जागा नगरपरिषदेने पुन्हा ताब्यात घेऊन नागरिकांच्या सार्वजनिक उपयोगासाठी खुली करावी.
सध्या नागरिक विचारणा करत असताना, संबंधित अधिकारी भूसंपादनाची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे किंवा सापडत नसल्याचे सांगून वेळ मारून नेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भातील लाक्षणिक उपोषणाचे रीतसर निवेदन २९ जून २०२६ रोजीच मुख्याधिकारी, नगरपरिषद तुळजापूर यांना देण्यात आले आहे. हे निवेदन देतेवेळी जयकुमार नागनाथ पांढरे, अमरीश भैय्या जाधव, शहाजी काका भांजी व विकास शिंदे उपस्थित होते.
”जनतेच्या सार्वजनिक हक्काची जागा वाचवा – नागरिकांचा हक्क अबाधित ठेवा,” अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. या आंदोलनात जवाहर गल्लीतील सर्व नागरिक, आजी-माजी नगरसेवक तसेच तुळजापुरातील जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.









