धाराशिव निळमय! आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धडकणार ऐतिहासिक ‘जनआक्रोश महामोर्चा’!
तुळजापूर प्रतिनिधी;- मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन सादर; संविधानाच्या आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी भीमसैनिकांचा एल्गार!
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे, संविधानाने दिलेल्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि सामाजिक न्यायाविरोधातील कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, या ठाम भूमिकेसह आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, जिल्हा धाराशिव यांच्यावतीने धाराशिव शहरात ऐतिहासिक ‘जनआक्रोश महामोर्चा’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांतून लाखोच्या संख्येने भीमजबाबदार नागरिक, महिला, युवक-युवती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अनुसूचित जातीतील ५९ जातींचे प्रतिनिधी मुसळधार पावसातही या महामोर्च्यात सहभागी झाले होते. निळ्या झेंड्यांच्या महासागरामुळे संपूर्ण धाराशिव शहर अक्षरशः “निळमय” झाले होते.
प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन
महामोर्चापूर्वी आयोजित जाहीर सभेत रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर आणि अमन आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
”संविधान, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी संघटित, शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने निर्णायक लढा उभारावा लागेल. घटनात्मक हक्कांवर होणारा कोणताही आघात सहन केला जाणार नाही!”
— आनंदराज आंबेडकर
यावेळी बोलताना उपस्थितांनी “संविधान वाचवायचे असेल तर आरक्षण वाचवावे लागेल आणि आरक्षण वाचवायचे असेल तर उपवर्गीकरणाचा कट हाणून पाडावा लागेल,” असा एकमुखी निर्धार व्यक्त केला.
मोर्चाचा मार्ग आणि मुख्य मागण्या
जिजाऊ चौक येथून महामोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजी महाराज चौक, संत गाडगे महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
”जय भीम”, “जय संविधान”, “आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा” आणि “संविधानाचा विजय असो” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण धाराशिव शहर दुमदुमून गेले.
मोर्च्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:
आरक्षण उपवर्गीकरण रद्द करणे: अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करून त्यासंबंधीची बदर समिती त्वरित बरखास्त करावी.
जातीनिहाय जनगणना: राज्यात त्वरित जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
साहित्य प्रकाशन: महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करावे.
शिष्यवृत्ती खात्यात जमा करणे: अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावी.
बार्टी महामंडळ प्रशासन: बाटी (BARTI) / बाटये महामंडळाचे संचालक सुनील वारे यांना पदावरून हटवून सक्षम प्रशासकाची नियुक्ती करावी.
रमाई आवास योजना अनुदान: नामांकित योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांना ₹१० लाखांपर्यंत अनुदान देण्यात यावे.
कायमस्वरूपी रोजगार: खाजगीकरण व कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करून कायमस्वरूपी रोजगाराला प्राधान्य द्यावे.
निधी व कर्जमाफी: सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर विभागांकडे वळवणे त्वरित थांबवावे तसेच महात्मा फुले महामंडळाच्या कर्जाची संपूर्ण कर्जमाफी करावी.
उल्लेखनीय उपस्थिती
या महामोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी कृती समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
सभेला समितीचे राजाभाऊ ओव्हाळ, जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ ओव्हाळ (मुन्ना राजे), धनंजय (नाना) शिंगाडे, कैलास शिंदे, अनिल हजारे, राहुल बनसोडे, संजयकुमार बनसोडे, नितीन शेरखाने, ॲड. भैय्यासाहेब साबणे, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, राजाभाऊ राऊत, गौतम बनसोडे, कुंदन वाघमारे, विकास बनसोडे, भालचंद्र कठारे, तानाजी बनसोडे, बाळासाहेब माने, सुनील वाघमारे, शांतिनाथ शेरखाने, प्रा. अशोक पापडे, अशोक बनसोडे, अरुण बनसोडे, सुनील (आप्पा) बनसोडे, आनंद भालेराव, ॲड. अरुणा गवई, डी. जी. हौसलमल, सतपाल बनसोडे, मराठवाडा कार्याध्यक्ष आनंद पांडागळे, तुळजापूर शहराध्यक्ष वैजनाथ पांडागळे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के , जिल्हा उपाध्यक्ष प्रताप (दादा ) कदम, जिल्हा युवक कार्यकर्ते धम्मशील कदम, रणजीत (बाप्पा) गायकवाड ,स्वप्निल शिंगाडे, सिद्धार्थ बनसोडे, प्रवीण शिरसाटे, भागवत शिंदे, मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे,सोमनाथ गायकवाड, रविंद्र लोमटे, यशपाल गायकवाड, पृथ्वीराज वाघमारे, मुकुंद लगाडे, भीमराज सरवदे, अरुण गरड यांच्यासह जिल्हाभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.









