किसान संघाचा तुळजापुरात निर्धार: २५ जिल्ह्यांत ३ लाख सभांसद नोंदणी करणार; ८ महत्त्वाचे ठराव मंजूर!
तुळजापूर प्रतिनिधी :-
भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या दोन दिवसीय व्यापक बैठकीत संघटन विस्तार, शेतीसमोरील आव्हाने आणि कृषिविकासाच्या आगामी अभियानावर चिंतन करून भविष्यातील धोरण निश्चित करण्यात आले. तुळजापूर येथे २९ व ३० ऑगस्ट रोजी आयोजित या संमेलनात राज्यातील २३ जिल्ह्यांमधून सुमारे ३६० प्रतिनिधी उपस्थित होते.
संमेलनाच्या सुरुवातीला राज्यातील खरीप हंगाम, पर्जन्यमान आणि शेतीस्थितीचा आढावा घेण्यात आला. असमान पावसामुळे निर्माण झालेली टंचाईसदृश परिस्थिती लक्षात घेता शासनाने तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
संघटन विस्ताराचा दृढ संकल्प
ग्रामीण भागात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील २७८ तालुक्यांमध्ये ३ लाख सदस्यांची नोंदणी करण्याचे आणि ३,००० ग्राम समित्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सदस्यतानंतर ग्राम, तालुका, जिल्हा आणि प्रांत स्तरावर निवडणुका घेऊन प्रांतस्तरीय अधिवेशन आयोजित केले जाईल.
संमेलनात मंजूर झालेले ८ प्रमुख ठराव:
टंचाईवर तातडीच्या उपाययोजना: टंचाईसदृश परिस्थितीचे दुष्काळात रूपांतर रोखण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना जाहीर कराव्यात.
इथेनॉल धोरणाला पाठिंबा: पेट्रोलमध्ये २५% व डिझेलमध्ये १०% इथेनॉल मिश्रणाचा प्रस्ताव केंद्र शासनाने विचारात घ्यावा.
वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण: वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांच्या जीवित-मालमत्तेच्या संरक्षणासाठी कायदेशीर अधिकार मिळावेत.
देशी गोवंश संवर्धन: गोसेवा आयोग आणि राज्य शासनाने पुरेशा तरतुदीसह व्यापक गोसंवर्धन धोरण राबवावे.
द्राक्ष उत्पादकांचे रक्षण: अफगाणिस्तानमार्गे येणाऱ्या अवैध चायनीज बेदाण्याच्या आयातीवर बंदी घालून स्थानिक उत्पादकांना संरक्षण द्यावे.
तरुण शेतकऱ्यांच्या विवाहाचा प्रश्न: शेती करणाऱ्या तरुणांच्या विवाहाचा प्रश्न सामाजिक मानून, कार्यकर्त्यांनी आपल्या मुलींचा विवाह शेतकरी तरुणांशी करून पुढाकार घेण्याचा ठराव मंजूर झाला.
मराठवाड्यात कृषी प्रक्रिया उद्योग: फळपिकांवरील प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी स्वतंत्र प्रोत्साहन योजना जाहीर करावी.
मराठवाडा वॉटर ग्रीडला गती: धरणे बंद पाइपलाइनने जोडून शाश्वत सिंचनासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प वेगाने राबवावा.
संघर्षाची तयारी
शेतकरीहिताच्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही किसान संघाने दिला आहे.
या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष के. साई रेड्डी, राष्ट्रीय मंत्री बाबूभाई पटेल, प्रांत अध्यक्ष बळिराम सोळुंके, पद्मश्री दादा लाड, प्रांत महामंत्री मदन देशपांडे आणि धाराशिव जिल्हाध्यक्ष नितीन घुले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.







