Best News Portal Development Company In India

वक्ता धाराशिवचा आवाज तरुणाईचा वक्तृत्व स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाची अमृता खटके प्रथम*

‘ *वक्ता धाराशिवचा आवाज तरुणाईचा वक्तृत्व स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाची अमृता खटके प्रथम*

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि. ५ ऑगस्ट : विलासराव देशमुख सेंटर, धाराशिव यांच्या वतीने ‘वक्ता धाराशिवचा आवाज तरुणाईचा’ या उपक्रमांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘राजकारणातील लोकशाही मूल्ये : आजच्या काळाची गरज’, ‘डिजिटल युगातील माध्यम साक्षरता’ आणि ‘युवक आणि नेतृत्व : आजची प्राथमिकता, उद्याचे भविष्य’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण व प्रभावी विचार मांडले.
स्पर्धेच्या माध्यमातून युवकांच्या मनातील सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय विषयांवरील विचारांना व्यासपीठ मिळाले. लोकशाही मूल्यांचे संवर्धन, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, माहितीची सत्यता तपासण्याची गरज तसेच देशाच्या भवितव्यामध्ये युवकांची वाढती भूमिका या विषयांवर स्पर्धकांनी परखडपणे आपली मते मांडली.
स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील खटके अमृता गुंडेराव यांनी प्रथम क्रमांक पटकावत रुपये २,५०० व स्मृतिचिन्ह मिळविले. बी.एस.एस. महाविद्यालय, माकणी येथील मुगळे सुप्रिया नेताजी यांनी द्वितीय क्रमांक मिळवून रुपये १,५०० व स्मृतिचिन्ह, तर भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा येथील जावळे संजना यांनी तृतीय क्रमांक मिळवून रुपये १,००० व स्मृतिचिन्ह पटकावले. श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी येथील म्हेत्रे आकांक्षा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
यावेळी मा. रवींद्र केसकर यांनी मनोगत व्यक्त करताना, युवकांनी केवळ वक्तृत्वकलेपुरते मर्यादित न राहता समाजातील प्रश्न समजून घेऊन त्यावर विधायक भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. विचारांची स्पष्टता, अभ्यासाची खोली आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम झाला तर तरुणाई परिवर्तनाची प्रभावी शक्ती ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले. आजच्या डिजिटल युगात युवकांनी माध्यमांचा विवेकपूर्ण वापर करून सत्य-असत्याची पडताळणी करावी आणि लोकशाही मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. रवींद्र केसकर व मा. प्रशांत पाटील उपस्थित होते. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जुन बिराजदार, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, मा. बाबा औटी, नगरसेवक बाबा मस्के, रेखाताई सूर्यवंशी, ॲड. जान्हवी कोथिंबीरे, आदर्श कोथिंबीरे, अभिषेक, अभिषेक औरादे, उपप्राचार्य विनोद देवरकर, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, पर्यवेक्षक शैलेश महामुनी आणि डॉ. श्रीशैल्य तोडकर यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. ढोबळे डी. बी. व श्री. अविनाश काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित रेड्डी यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india