श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; ‘वृक्षप्रसाद’ योजनेचा धडाक्यात प्रारंभ!
तुळजापूर प्रतिनिधी;- भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणापूर्वी सर्वप्रथम राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ सादर करण्यात आले, ज्यानंतर ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सादर केले व देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमास तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, लेखाधिकारी संतोष भेंकी यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिषेक दर्शन घेणाऱ्या भाविकांना मिळणार ‘वृक्षप्रसाद’
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मंदिर संस्थानच्या वतीने एका अनोख्या व पर्यावरणपूरक उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. विधी व न्याय विभागाच्या सूचनेनुसार, १५ ऑगस्ट २०२६ पासून ‘वृक्षप्रसाद योजना’ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत अभिषेक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर संस्थानतर्फे प्रसादाच्या रूपात एक रोप (झाड) दिले जात आहे. भाविकांनी हा ‘वृक्षप्रसाद’ आदराने स्वीकारून त्याचे योग्य ठिकाणी रोपण व संगोपन करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.








