Best News Portal Development Company In India

ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या ‘स्वच्छ उमरगा, सुंदर उमरगा, हरीत उमरगा’ महाअभियानाला श्रमदानाने सुरुवात!

*ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या ‘स्वच्छ उमरगा, सुंदर उमरगा, हरीत उमरगा’ महाअभियानाला श्रमदानाने सुरुवात*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
विद्यार्थी, युवक, महिला व स्वयंसेवक उतरले रस्त्यावर; विविध भागांतून तब्बल 10 पोते कचरा संकलित; नगर परिषदेसमोर कचऱ्याला हार घालून ‘गांधीगिरी’
उमरगा, दि. 15 : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने दि. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या महिनाभराच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ उमरगा,सुंदर उमरगा, हरीत उमरगा’ महाअभियानाला शुक्रवारी उत्स्फूर्त सुरुवात झाली.
अभियानाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, युवक, महिला आणि फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष श्रमदान करून उघड्यावर पडलेला जवळपास 10 पोते कचरा संकलित केला. त्यानंतर हा कचरा नगर परिषदेसमोर ठेवून त्याला प्रतीकात्मक हार घालत शांततामय ‘गांधीगिरी’च्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
उमरगा येथील ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या कार्यालयापासून अभियानाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी विजय जाधव, धम्मचारी प्रज्ञाजीत आणि ॲड. शीतल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करून स्वच्छता, नागरिकांची जबाबदारी, प्रशासनाची कर्तव्ये आणि लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी बोलताना शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगर परिषद अथवा स्वच्छता कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी नियमित कचरा संकलन, नाल्यांची साफसफाई आणि सार्वजनिक स्वच्छता ही नगर परिषद प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असून नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडताना प्रशासनालाही त्याच्या कर्तव्याची सातत्याने जाणीव करून देण्याची भूमिका अभियानातून घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
*फलक हातात घेऊन घोषणाबाजी; विविध भागांत श्रमदान*
यानंतर विद्यार्थी, युवक, महिला आणि फाउंडेशनचे स्वयंसेवक स्वच्छतेचे संदेश देणारे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करीत शहरातील विविध भागांत पोहोचले. बालाजी मंदिराशेजारील परिसर, हनुमान मंदिराशेजारील परिसर, हमीद नगर तसेच डॉ. गणेश नगर परिसरात स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष श्रमदान केले.
रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांमध्ये तसेच नाल्यांच्या परिसरात उघड्यावर पडलेला कचरा स्वयंसेवकांनी गोळा केला. अभियानाच्या पहिल्याच सत्रात विविध भागांतून जवळपास 10 पोते कचरा संकलित झाला.
नागरिकांशी संवादातून समस्यांचा पाढा
स्वच्छता करतानाच फाउंडेशनच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांनी स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी शहराच्या स्वच्छता व्यवस्थेबाबत अनेक अडचणी मांडल्या.
कचरा संकलन करणारी गाडी नियमित येत नसल्याने नाइलाजाने कचरा उघड्यावर टाकावा लागत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. अनेक भागांतील नाल्यांची व्यवस्थित व नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली.
नाल्यांची वेळेवर साफसफाई न झाल्याने त्या तुंबतात व सांडपाणी साचून राहते. काही ठिकाणी हे साचलेले पाणी घरांच्या भिंतीलगत राहत असल्याने भिंती ओल्या होणे, कुजकट होणे व दुर्गंधी निर्माण होणे अशा समस्या भेडसावत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
विशेषतः नाल्यांमधून कधीतरी काढण्यात आलेली घाण तातडीने उचलली जात नसल्याची गंभीर बाबही नागरिकांनी निदर्शनास आणून दिली. ही घाण नाल्यांच्या कडेलाच पडून राहत असल्याने डुकरे व कुत्री ती पुन्हा पसरवतात, तर पावसाच्या पाण्यासोबत तीच घाण पुन्हा नाल्यांमध्ये जाऊन नाले तुंबतात. त्यामुळे नाले साफ करून घाण बाजूला काढण्यापुरती कार्यवाही न करता ती तातडीने उचलण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.

*10 पोते कचरा नगर परिषदेसमोर; हार घालून ‘गांधीगिरी’*

शहरातील विविध भागांतून श्रमदानाद्वारे संकलित करण्यात आलेली जवळपास 10 पोते कचऱ्याची पोती नगर परिषद कार्यालयासमोर आणण्यात आली. या कचऱ्याला प्रतीकात्मक स्वरूपात हार घालून प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेकडे शांततामय पद्धतीने लक्ष वेधण्यात आले आणि अशा प्रकारे अभियानाच्या पहिल्या सत्राची सांगता करण्यात आली.
फाउंडेशनने यापूर्वीच अभियानाची भूमिका स्पष्ट करताना ‘आमचा विरोध व्यक्तीला नाही, निष्क्रियतेला आहे; आमचे आंदोलन आक्रमक नाही, आग्रही आहे आणि आमचा मार्ग संविधानिक, शांततामय व संयमाचा आहे’ असे जाहीर केले होते. त्याच भूमिकेतून पहिल्याच दिवशी ‘गांधीगिरी’ करण्यात आली.
महिनाभर शहराच्या विविध भागांत अभियान
दि. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान हे अभियान शहराच्या विविध भागांत सुरू राहणार आहे. प्रत्यक्ष स्वच्छता व श्रमदानासोबत नागरिकांमध्ये जनजागृती, घरोघरी संवाद, प्रभागनिहाय स्वच्छतेच्या समस्यांची नोंद, संबंधित समस्या प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या लेखी निदर्शनास आणून देणे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पथनाट्य, प्रभातफेरी तसेच संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
नागरिकांनीही उघड्यावर अथवा नाल्यांमध्ये कचरा न टाकता घंटागाडीकडेच कचरा द्यावा, स्वतःचे घर व गल्लीचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि शहरातील स्वच्छतेच्या समस्या शक्यतो छायाचित्र व GPS लोकेशनसह फाउंडेशनच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या अभियानात शांताबाई चव्हाण, ॲड. शीतल चव्हाण, धम्मचारी प्रज्ञाजीत, विजय जाधव, राजू बटगिरे, ॲड. अर्चना जाधव, ॲड. फिरोज मुल्ला, सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, इरान्ना बसगुंडे, राम लोहार, प्रदीप चौधरी, करिम शेख, किशोर बसगुंडे, ज्योती माने, मयूर कटके, विजय चितली, सिद्राम जमादार, नागेश चलकुरे, शंकर दंडगुले यांच्यासह बहुजन हिताय वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india