गंधोरा ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण: ‘SIT’ चौकशीसाठी वैजनाथ सुरवसे यांचे १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण; आत्मदहनाचा इशारा!
तुळजापूर प्रतिनिधी:-
गंधोरा ग्रामपंचायतीमध्ये सन २०२१ ते २०२५ या कालावधीत कागदोपत्री मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय SIT (विशेष चौकशी पथक) द्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी उपोषणकर्ते वैजनाथ शामराव सुरवसे यांनी १५ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा तीव्र इशाराही त्यांनी दिला आहे.
”भष्टाचार खपवून घेतला जाणार नाही!” असा आक्रमक पवित्रा घेत, तुळजापूर पंचायत समिती, जिल्हा परिषद धाराशिव आणि जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्याशी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या:
उच्चस्तरीय SIT चौकशी: गंधोरा ग्रामपंचायतीमध्ये २०२१ ते २०२५ या काळात झालेल्या सर्व कागदोपत्री व आर्थिक गैरव्यवहारांची SIT मार्फत सखोल चौकशी व्हावी.
दोषींवर निलंबनाची कारवाई: या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून बडतर्फ करण्यात यावे.
विशेष लेखापरीक्षण (Special Audit): ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता उघड करण्यासाठी विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे.
”आमचे समाधान फक्त न्यायाातूनच होईल! न्याय हवा… भ्रष्टाचाराचा बंदोबस्त हवा…!” असा नारा देत हे आंदोलन छेडण्यात आले आहे. प्रशासनाने यावर त्वरित पावले न उचलल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.







