*ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या महाअभियानात वृक्षारोपणासह शहरभर जनजागृती*
*महिलांच्या हस्ते वृक्षारोपण; संगोपनाची जबाबदारी भजनी मंडळाकडे, लाऊडस्पीकरद्वारे स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश*
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने सुरू असलेल्या ‘स्वच्छ उमरगा, सुंदर उमरगा, हरीत उमरगा’ महाअभियानाच्या पाचव्या सत्रात मंगळवारी (दि. १८) शहरातील जुनी पेठ भागातील श्री चौडेश्वरी देवस्थान परिसरात महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी देवस्थानच्या महिला भजनी मंडळाकडे सोपविण्यात आली. त्याचबरोबर दिवसभर लाऊडस्पीकरच्या माध्यमातून शहरातील विविध भागांत स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
शहर स्वच्छ, सुंदर आणि हरीत करण्यासाठी नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने फाउंडेशनने हे महाअभियान हाती घेतले आहे. याअंतर्गत आतापर्यंत शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी, नागरिकांशी संवाद, श्रमदान, स्वच्छता, पत्रक वाटप तसेच निदर्शनास आलेल्या नागरी समस्या नगर परिषदेसमोर मांडण्याचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याच मालिकेतील पाचवे सत्र पर्यावरण संवर्धन आणि व्यापक जनजागृतीवर केंद्रित करण्यात आले.
श्री चौडेश्वरी देवस्थान परिसरात आयोजित कार्यक्रमात परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘एक नागरिक – एक झाड, हरीत उमरग्याचा हाच निर्धार’, ‘आज लावलेले एक झाड, उद्याच्या पिढीला देईल शुद्ध श्वास’, ‘स्वच्छ उमरगा, सुंदर उमरगा, हरीत उमरगा, निरोगी उमरगा’ अशा संदेशांचे फलक हातात घेऊन महिलांनी नागरिकांना स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनाचे आवाहन केले.
वृक्षारोपणाचे कार्यक्रम अनेकदा केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित राहतात. त्यानंतर योग्य निगा न राखल्यामुळे झाडे जगत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन फाउंडेशनने या उपक्रमात ‘झाड लावण्यासोबत ते जगविणे’ यावर भर दिला. त्यामुळे लावण्यात आलेल्या झाडांना नियमित पाणी देणे व त्यांची निगा राखण्याची जबाबदारी स्थानिक महिला भजनी मंडळाने स्वीकारली.
दरम्यान, महाअभियानाचा संदेश शहरातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंगळवारी दिवसभर लाऊडस्पीकर रिक्षाद्वारे शहरातील विविध भागांत जनजागृतीपर गाणी व संदेश प्रसारित करण्यात आले. स्वच्छता राखणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखणे आदी विषयांवर नागरिकांना आवाहन करण्यात आले. लाऊडस्पीकरद्वारे करण्यात आलेल्या या जनजागृतीसाठी किशोर बसगुंडे व धनराज ल्याळे यांनी पुढाकार घेतला.
वृक्षारोपण कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, मातोश्री शांताबाई चव्हाण, सुजाता बसगुंडे, इरण्णा बसगुंडे, व्यंकट ऊर्फ राजू भालेराव, प्रकाश टोपगे, नागेश बटगिरे, संतोष टोपगे, ॲड. अर्चना जाधव, मीना कोडते, लक्ष्मी टोपगे, बबीता मदने, रागिनी शानेदिवाण, सारिकाताई इटकर, रंजनाताई जाधव, पुष्पा आबाचने, मीराबाई घोडके, सुग्राबाई यांच्यासह महिला व नागरिकांची उपस्थिती होती.
शहर स्वच्छ व सुंदर करण्याची जबाबदारी केवळ नगर परिषदेची नसून नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे. स्वच्छतेबरोबरच शहरातील हरित क्षेत्र वाढावे, लावलेले प्रत्येक झाड जगावे आणि नागरिकांमध्ये आपल्या परिसराविषयी जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने महाअभियानाचे पुढील उपक्रमही टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.







