तामलवाडी टोलनाक्यावरील छोटे व्यावसायिक यांच्या रोजगारासाठी काँग्रेसचे आक्रमक आंदोलन जाहीर पाठिंबा, प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने!
तुळजापूर प्रतिनिधी;-
धाराशिव जिल्ह्यातील मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या आणि श्री तुळजाभवानी देवीच्या मुख्य मार्गावरील तामलवाडी टोलनाक्यावर (ता. तुळजापूर) स्थानिक छोटे-मोठे व्यावसायिक व स्थानिक नागरिक आपल्या उपजीविकेच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. टोलनाक्याच्या दुतर्फा असलेल्या ५० ते ६० चहाच्या टपऱ्या, स्नॅक्स सेंटर, खानावळी आणि हॉटेल व्यावसायिकांना उठवण्याच्या प्रशासकीय हालचालींविरोधात स्थानिकांनी जोरदार आंदोलन छेडले असून, काँग्रेस पक्षाने या आंदोलनात उतरून व्यावसायिकांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
तामलवाडी टोलनाक्याजवळ गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांची लहान-मोठी दुकाने आहेत. ही दुकाने काढून टाकण्यासाठी पालकमंत्री आणि IRB (आयआरबी) अधिकाऱ्यांची बैठक झाली असून, नुकतीच RTO व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागेची मोजणी केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे सुमारे ५० ते ६० कटुंबे आणि शेकडो स्थानिक नागरिक रस्त्यावर येण्याची भीती निर्माण झाली आहे.
पालकमंत्र्यांनी ‘पालका’ची भूमिका बजावावी: काँग्रेस नेत्यांचा घणाघात
आंदोलनस्थळी पोहोचलेल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रशासनाचा आणि पालकमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
”केंद्र आणि राज्य सरकारने दरवर्षी करोडो नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात बेरोजगारांना रोजगार मिळालेला नाही. लोक स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या जागेत लहान-मोठे व्यवसाय करून पोट भरत आहेत. जर तुम्हाला दुकाने हटवायचीच असतील तर संपूर्ण राज्यातील टोलनाक्यांवरील दुकाने हटवून दाखवा. बांधकाम नियमावली (Building Line 70m) ही पक्क्या (स्लॅब) बांधकामासाठी लागू असते; स्वतःच्या जागेत पत्र्याचे शेड उभारून व्यवसाय करणाऱ्यांना उठवण्याचा प्रशासनाला अधिकार नाही. पालकमंत्र्यांनी सूडबुद्धीने काम न करता पालकाची भूमिका बजावत या व्यापाऱ्यांना अभय दिले पाहिजे. जर स्थानिकांचा रोजगार हिरावण्याचा प्रयत्न झाला, तर काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने स्थानिकांच्या पाठीशी उभा राहील.”
”आम्ही काय खायचे?” – स्थानिक बाधित वयोवृद्धांची व्यथा
आंदोलनात सहभागी झालेल्या एका ज्येष्ठ महिला वयोवृद्धाने आणि स्थानिक व्यापाऱ्याने आपली व्यथा मांडताना सांगितले:
”रस्ता रुंदीकरणात आमची मूळ जमीन गेली, त्याचे पैसेही न्यायालयात अडकले आहेत. आता उरलेल्या थोड्याशा जागेवर दुकाने टाकून आम्ही १०-१५ लोकांचे कुटुंब चालवत आहोत. आता आरटीओ आणि अधिकारी येऊन दुकाने काढण्याच्या नोटिसा देत आहेत. आमच्या हाताला काम नाही, जमीन नाही, आता हे व्यवसायही बंद झाले तर आम्ही काय खायचे आणि कसे जगायचे?”
स्थानिक व्यावसायिकांच्या मुख्य मागण्या:
१. रोजगार वाचवा: तामलवाडी परिसरातील ५०-६० कुटुंबांचा रोजगार हिरावून घेणारी कारवाई त्वरित थांबवावी.
२. कायदेशीर संरक्षण: तात्पुरत्या स्वरूपातील शेड व दुकानांवर कारवाई करू नये.
३. प्रशासकीय दिलासा: RTO आणि IRB अधिकाऱ्यांकडून होणारी मोजणी व नोटिसांची कारवाई कायमची रद्द करावी.
या आंदोलनात धाराशिव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष धीरज (भैया) पाटील, तुळजापूर नगर परिषदेचे गटनेते अमोल कुतवळ, आणि काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते, शेतकरी, दुकानदार, उपस्थित होते. तुळजापूर-सोलापूर मार्गावरील या आंदोलनामुळे प्रशासकीय गोटात खळबळ उडाली असून, स्थानिकांचा रोष पाहता आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








