Best News Portal Development Company In India

*ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनची जुनी विहीर व हापसा पुनरुज्जीवित करण्याची मागणी!

*ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनची जुनी विहीर व हापसा पुनरुज्जीवित करण्याची मागणी*

*‘दुष्काळात तहान भागविणारे जलस्रोत बुजवू नका, जतन करा’; गणू डॉक्टर प्लॉट-काळे प्लॉट परिसरातील जलस्रोतांसाठी नगर परिषदेला निवेदन*

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
शहरातील गणू डॉक्टर प्लॉट-काळे प्लॉट परिसरातील जुनी विहीर बुजविण्याऐवजी तिचे जतन व पुनरुज्जीवन करावे, तसेच बंद पडलेला सार्वजनिक हापसा दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करावा, अशी मागणी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 21) नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ‘स्वच्छ उमरगा • सुंदर उमरगा • हरीत उमरगा’ महाअभियानांतर्गत हा प्रश्न हाती घेण्यात आला आहे.

उमरग्यात पूर्वी निर्माण झालेल्या भीषण दुष्काळ व पाणीटंचाईच्या काळात या हापश्याने तीन-चार गल्ल्यांतील नागरिकांची पाण्याची गरज भागविली होती. पाणीटंचाई अधिक तीव्र झाल्यानंतर संबंधित जुन्या विहिरीतील झऱ्यातून जमा होणारे पाणीही नागरिक वापरत होते. त्यामुळे हे दोन्ही जलस्रोत परिसराच्या जुन्या आठवणींसोबतच पाणीटंचाईविरुद्धच्या संघर्षाचे साक्षीदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सध्या मात्र हापसा बंद पडला असून विहिरीत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्याने तिचे अक्षरशः कचरा डेपोमध्ये रूपांतर झाले आहे. परिणामी परिसरातील काही नागरिकांना खाजगी बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे.

दरम्यान, जुनी विहीर बुजवून अन्य ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत असल्याने, असा प्रस्ताव असल्यास त्याचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. नवीन जलस्रोत निर्माण करण्यास विरोध नसला तरी अस्तित्वातील नैसर्गिक जलस्रोत नष्ट करणे योग्य नाही. आज पाणी उपलब्ध असले तरी भविष्यात पुन्हा टंचाई उद्भवणार नाही याची हमी नसल्याने विहीर बुजविणे हा पहिला नव्हे, शेवटचा पर्याय असावा, अशी भूमिका फाउंडेशनने मांडली आहे.

नगर परिषदेने विहिरीच्या मालकी व महसुली अभिलेखांची तपासणी करून ती खाजगी मालकीची असल्यास संबंधित मालकाशी संवाद साधावा. सार्वजनिक हितासाठी तिचे हस्तांतरण अथवा आवश्यक कायदेशीर प्रक्रियेद्वारे अधिग्रहण करण्याची शक्यता तपासावी. विहिरीतील कचरा व गाळ काढून खोली, नैसर्गिक झरे, पाण्याची उपलब्धता, पुनर्भरण क्षमता व संरचनात्मक स्थितीची तांत्रिक तपासणी करावी. पाण्याची गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासून त्याचा योग्य सार्वजनिक वापर निश्चित करावा. तसेच दगडी बांधकाम, संरक्षक कठडा अथवा जाळी उभारून विहीर सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बंद हापश्याचीही तातडीने तांत्रिक तपासणी करून तो दुरुस्त करावा. ते शक्य नसल्यास भूजल तपासणीनंतर त्याच ठिकाणी बोअरवेल, पाण्याची टाकी व नळव्यवस्था उभारून परिसरातील सर्वसामान्य व कष्टकरी नागरिकांना मोफत सार्वजनिक पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे.

या कामासाठी नगर परिषद निधी, उपलब्ध शासकीय योजना, महसूल प्रशासनाचे सहकार्य तसेच आवश्यकता भासल्यास लोकवाटा व लोकसहभागाचा उपयोग करता येईल. जलस्रोतांची स्वच्छता, पुनरुज्जीवन व जनजागृतीसाठी फाउंडेशननेही सहकार्याची तयारी दर्शविली आहे.

“शहराचा विकास म्हणजे केवळ नवीन जलस्रोत निर्माण करणे नव्हे; संकटाच्या काळात नागरिकांची तहान भागविणाऱ्या जुन्या नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करणेही शाश्वत विकासाचा भाग आहे. ज्या विहिरीने आणि हापश्याने दुष्काळात साथ दिली, ते पुढील पिढीसाठी जतन केले पाहिजेत,” अशी भूमिका फाउंडेशनच्या वतीने मांडण्यात आली. निवेदनावर ऍड. अर्चना जाधव, करिम शेख, किशोर बसगुंडे, बबीता मदने, आशा कांबळे, कोमल गायकवाड, सत्यनारायण जाधव, राजू बटगिरे, राजू भालेराव, प्रदीप चौधरी, ज्योती माने, शबाना उडचणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india