राजकारणापलीकडे जाऊन मावळच्या उद्योगवाढीसाठी एकत्र येण्याची गरज – अभिजीत आपटे
तळेगाव दाभाडे : मावळमधील तरुण, शेतकरी आणि महिला बचत गटांना उद्योग-व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत आपटे यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध उद्योजक रामदास आप्पा काकडे यांचे कार्य मावळमधील नव्या पिढीतील उद्योजकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागात तयार होणाऱ्या उत्पादनांना शहरातील मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “बनेगा गाव में, बिकेगा शहर में” या संकल्पनेवर आधारित छत्रपती शिवाजी महाराज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज स्थापन करण्याची कल्पना आपण मांडली असल्याचे आपटे यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून मावळमधील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना स्थानिक पातळीवर व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक स्तरांवर प्रयत्न करूनही अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
“रामदास आप्पा काकडे यांच्यासमोर ही संकल्पना मांडल्यानंतर त्यांनी कोणताही पक्षीय विचार न करता तिचे महत्त्व ओळखले आणि सहकार्याची सकारात्मक भूमिका घेतली. आजच्या काळात विकासाच्या विषयांवर अशी व्यापक आणि सकारात्मक भूमिका घेणाऱ्या व्यक्तींची गरज आहे,” असे अभिजीत आपटे म्हणाले.
आपटे पुढे म्हणाले की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असलो तरी काकडे यांनी राजकीय भेदभाव न ठेवता मावळच्या विकासाशी संबंधित या संकल्पनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. या विषयावर रणजितदादा काकडे यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
मावळच्या मातीत मोठी उद्योजकीय क्षमता दडलेली आहे. योग्य प्रशिक्षण, आर्थिक मार्गदर्शन, बाजारपेठेची माहिती आणि अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळाल्यास येथील हजारो तरुण स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात. त्यामुळे यशस्वी उद्योजकांच्या अनुभवाचा फायदा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे आपटे यांनी स्पष्ट केले.
“उद्योग उभारणारा व्यक्ती हा केवळ स्वतःसाठी काम करत नाही, तर अनेकांच्या रोजगाराची आणि कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीची संधी निर्माण करत असतो. त्यामुळे उद्योजकांविषयी समाजात सकारात्मक वातावरण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असेही ते म्हणाले.
राजकीय मतभेद हा लोकशाहीचा भाग असला तरी विकासाच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. एखाद्या उद्योजकाबाबत सातत्याने नकारात्मक वातावरण निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संबंधित व्यक्तीबरोबरच त्या परिसरातील उद्योग, रोजगार आणि भविष्यातील गुंतवणुकीवरही होऊ शकतो, असे मत आपटे यांनी व्यक्त केले.
मावळच्या विकासासाठी विधायक विचारांची आणि सकारात्मक सहकार्याची गरज असून, रामदास आप्पा काकडे यांच्यासारख्या अनुभवी उद्योजकांनी नव्या पिढीला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“रामदास आप्पा काकडे यांच्याकडे केवळ यशस्वी व्यावसायिक म्हणून न पाहता मावळच्या उद्योगशील तरुणांसाठी मार्गदर्शक म्हणून पाहिले पाहिजे. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून अनेक नवे उद्योजक घडू शकतात. त्यामुळे मावळच्या तरुणांसाठी ते खऱ्या अर्थाने प्रेरणेचा दीपस्तंभ आहेत,” असे अभिजीत आपटे यांनी सांगितले.






