*ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा*
डॉ. कार्ल मार्क्स यांचा जहाल साम्यवाद आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीचा शांततावादी गांधीवाद ….या विचार वैभवातून भारत देशाला समाजवादी सुधारकांची महान वैचारिक परंपरा लाभली असून याच परंपरेतील समाजवादी विचारांचे ज्येष्ठ प्रवर्तक, सामाजिक जाणिवांचे प्रखर दीपस्तंभ आणि निष्ठावान कार्यकर्ते आदरणीय पत्रलाल सुराणा यांचे निधन ही समाजवादी चळवळीची अपूरणीय हानी आहे. त्यांच्या साधेपणातही अस्खलित विचारांची ताकद होती आणि कार्यातही तितकाच प्रामाणिकपणा दिसत होता. जगण्यात आदर्श अशी शालीनता होती. राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, आपलं घर नळदुर्ग संस्थेचे आधारस्तंभ आणि आयुष्यभर समाजवादी तत्त्वांचे पालन करणारे पत्रलाल भाऊ सुराणा यांनी लोकहिताची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवली. समाजातील वंचित, दुर्बल आणि कष्टकरी, पिचलेल्या घटकांबद्दल त्यांच्यात असलेला जिव्हाळा पाहून अनेकांना प्रेरणा मिळाली. आयुष्यभर संवैधानिक तत्वांची जोपासना केली, जगण्यातला साधेपणा अन् विचारातील महानता त्यांनी निरंतर जोपासली.
पत्रकारितेपासून ग्रामविकास समितीपर्यंत, साहित्यिक कार्यापासून समाजवादी चिंतनापर्यंत त्यांच्या कार्याचा व्याप विशाल होता. त्यांच्या जाण्याने समाजवादी चळवळीचा एक मजबूत आधारस्तंभ हरपल्याची जाणीव सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांचे विचार, त्यांची संवेदनशीलता आणि समाजसेवेचे अपार भान पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. अशा थोर व्यक्तिमत्त्वाला आमची विनम्र आणि शतशः भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रा. (डॉ) दत्ता साखरे
राज्यशास्त्र विभाग प्रमुख
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव.






