भलेही कुणाला नका का न्याय मिळेना तिथं…!
५२ कोटींची भव्य इमारत उभी, पण न्याय मिळालाच पाहिजे; नाहीतर सगळा दिखावाच!
तुळजापूर न्यायालयाच्या नव्या इमारतीचे २० डिसेंबर रोजी उद्घाटन
तुळजापूर :
“भलेही कुणाला नका का न्याय मिळेना तिथं…” अशी खंत व्यक्त होऊ नये, यासाठीच न्यायालय उभं असतं. तुळजापूर येथे तब्बल ५२ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नव्या न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन २० डिसेंबर रोजी होत आहे. मात्र, भव्य इमारत उभी राहिली म्हणजे न्याय मिळालाच, असं होत नाही; सामान्य नागरिकाला वेळेत आणि निर्भयपणे न्याय मिळाला तरच या इमारतीचा खरा उपयोग झाला, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोट्यवधींच्या खर्चातून उभारलेली ही आधुनिक इमारत केवळ उद्घाटन, फिती कापणे आणि फोटोसेशनपुरती मर्यादित राहू नये. न्यायप्रक्रिया सुलभ, जलद आणि पारदर्शक होईल का? हाच खरा प्रश्न आहे. अन्यथा, भव्य वास्तू उभी राहूनही न्यायासाठी वर्षानुवर्षे हेलपाटे मारावे लागले, तर हा सगळा प्रकार दिखाव्याचा बाजार ठरेल, अशी टीका नागरिकांतून होत आहे.
तुळजापूरसारख्या ऐतिहासिक व धार्मिक शहरात न्यायालय ही केवळ इमारत नसून न्याय, विश्वास आणि लोकशाहीची मजबूत पायाभरणी आहे. त्यामुळे या ५२ कोटींच्या इमारतीतून गरीब, शोषित आणि सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळेल का, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्याय मिळाला, तरच इमारतीचा खर्च सार्थ ठरेल; अन्यथा कोट्यवधींची गुंतवणूक फक्त दिखावाच ठरेल.






