Best News Portal Development Company In India

ग्रामीण रुग्णालय मुरूम येथे ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न!

ग्रामीण रुग्णालय मुरूम येथे ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न

​महिलांनी चाळीशीनंतर आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे….वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अर्दाळे

उमरगा/ लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

येथील ग्रामीण रुग्णालयात आंतरराष्ट्रीय रजोनिवृत्ती दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अर्दाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’ (Menopause Clinic) अंतर्गत विशेष जनजागृती व आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रविवारी (दि. १८) रोजी करण्यात आले. या शिबिराला मुरूम शहर व परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

​कार्यक्रमाप्रसंगी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अर्दाळे यांनी सांगितले की, महिलांच्या आयुष्यात वयाच्या ४५ ते ५० वर्षे वयोगटादरम्यान मासिक पाळी कायमची बंद होण्याच्या टप्प्याला ‘रजोनिवृत्ती’ (Menopause) असे म्हणतात. हा बदल नैसर्गिक असला तरी या काळात महिलांना अनेक शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. अशा वेळी योग्य समुपदेशन, संतुलित आहार-पोषण आणि नियमित काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याप्रसंगी डॉ. अर्दाळे यांनी विविध शारीरिक त्रासांनी त्रस्त असलेल्या महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक तो वैद्यकीय सल्ला दिला.

​या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव कोरे, लखन भोसले, संदीप बाबळसुरे, सुजाता मठपती, स्वाती डोंगरे, ज्योती जाधव, शीतल सुरवसे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सर्व आरोग्य आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

​उपस्थित महिलांना रजोनिवृत्तीच्या काळात उद्भवणारे त्रास, कॅल्शियम व जीवनसत्त्वांची गरज, मानसिक आरोग्य सांभाळणे आणि नियमित व्यायामाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामुळे परिसरातील महिलांमध्ये आरोग्याविषयी विशेष जनजागृती होण्यास मदत झाली असून, उपक्रमाबद्दल महिला भगिनींनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे आभार मानले.

रजोनिवृत्तीच्या काळात कोणताही शारीरिक अथवा मानसिक त्रास जाणवल्यास महिलांनी लाज न बाळगता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात महेश अर्दाळे बोलताना वैभव कोरे व अन्य.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india