आंबेवाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा; बुद्ध-भीम विचारांचा घुमला गजर!
सामुदायिक त्रिशरण-पंचशील ग्रहाणाने परिसर झाला बौद्धमय; मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा.
तुळजापूर प्रतिनिधी;-
मौजे आंबेवाडी (ता. जि. धाराशिव) येथील समाज मंदिरात विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन अत्यंत मंगलमय, उत्साहपूर्ण आणि सामाजिक एकोप्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी महिला, पुरुष, युवक-युवती आणि बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवांना भावपूर्ण अभिवादन केले. बुद्धांची शांती-करुणा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता व बंधुतेच्या विचारांनी संपूर्ण आंबेवाडी परिसर दुमदुमून गेला होता.
महामानवांना अभिवादन व सामूहिक धम्मवंदना
कार्यक्रमाची सुरुवात महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व नागरिकांनी अत्यंत शिस्तबद्धतेने सामुदायिक त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केले. या सामूहिक धम्मवंदनेमुळे समाज मंदिर परिसरात अत्यंत पवित्र आणि बौद्धमय वातावरण निर्माण झाले होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा: राजाभाऊ राऊत
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक आणि वैचारिक महत्त्व विशद केले.
“१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन अस्पृश्यता व विषमतेविरुद्ध क्रांती घडवली. हा दिवस मानवाला आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा देणारा आहे. आजच्या काळातही तथागत बुद्धांचा शांती, प्रज्ञा, करुणा आणि डॉ. बाबासाहेबांच्या
संविधानिक मूल्यांचे आचरण करणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन राजाभाऊ राऊत यांनी केले.
तसेच गौतम आंबेवाडीकर यांनीही आपले विचार मांडताना, महामानवांचे मानवतावादी विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
मिठाई वाटप आणि उत्सहाचे वातावरण
विचारपिठ वरील भाषणानंतर उपस्थित सर्व महिला, पुरुष आणि लहान मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आनंद साजरा केला.
या वेळी आरपीआय (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्यासह गौतम आंबेवाडीकर, संतोष राऊत, दादा राऊत, अविनाश राऊत, हनुमंत कांबळे, नामदेव कांबळे, दामोदर राऊत, राहुल राऊत, मेंसू राऊत, मारुती राऊत, सिनु राऊत, देविदास राऊत, अश्विनी राऊत, कमल राऊत, दिपाली राऊत, लक्ष्मी राऊत, महानंदा राऊत, सुनंदा राऊत, प्रज्ञा राऊत, कोमल राऊत, विमल कांबळे, छाया कांबळे, महानंद कांबळे आणि आंबेवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तथागत बुद्धांचा शांततेचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतेचे विचार घराघरांत पोहोचवण्याचा दृढ निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.







