तुळजापूर बँक ऑफ महाराष्ट्रच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी!
तुळजापूर प्रतिनिधी:-
पीककर्ज मंजुरीतील दिरंगाई, शासकीय अनुदानाची अडवणूक आणि बँकेत मिळणारी अपमानास्पद वागणूक यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी आता बँक ऑफ महाराष्ट्रच्या तुळजापूर शाखेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने याप्रकरणी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्यात आली असून, दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीककर्ज आणि अनुदानासाठी माराव्या लागतात चकरा-
तक्रार निवेदनानुसार, तुळजापूर शाखेतील अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक व मानसिक पिळवणूक केली जात आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे अनुदान खात्यात जमा करण्यास बँकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, नवीन पीककर्जासाठी अर्ज करून दोन-दोन, तीन-तीन महिने उलटले तरी कर्जाची मंजुरी मिळत नाही. यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पार कोलमडले असून पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कर्जमाफीनंतरही नव्या कर्जासाठी अडवणूक
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, त्यांनाही नवीन पीककर्ज देताना बँकेकडून विनाकारण अडचणी निर्माण केल्या जात आहेत. शाखेत गेलेल्या शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत ठेवणे आणि अपमानास्पद वागणूक देणे, असे प्रकार सर्रास घडत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांची नावे निवेदनात; मराठी व्यवस्थापकाची मागणी-
या निवेदनात बँक ऑफ महाराष्ट्र, तुळजापूर शाखेतील अधिकारी नागेंद्र कुमार आणि श्रीनिवास मंदा यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी सहज मांडता याव्यात यासाठी तुळजापूर शाखेत ‘मराठी भाषिक व्यवस्थापकाची’ तातडीने नियुक्ती करावी, असा आग्रहही धरण्यात आला आहे.
मंत्रालयापर्यंत तक्रारीच्या प्रती- आंदोलनाचा इशारा
हे निवेदन भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने लक्ष्मीकांत (बालाजी) रामचंद्र जाधव (तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे महसूल मंत्री, कृषिमंत्री तसेच तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या या रास्त तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा थेट इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.








