तुळजापुरात घडली मानवी जिवनाची प्रेरणादायी घटना: सुरक्षा जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचला भाविकाचा जीव!
तुळजापूर प्रतिनिधी:-
श्री तुळजाभवानी मंदिराच्या घाटशीळ मंदिर परिसरात कर्तव्यात तत्पर असलेल्या सुरक्षा जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका बेशुद्ध भाविकाचे प्राण वाचल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल २५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास गुलबर्गा (कर्नाटक) येथील रहिवासी असलेले भाविक अनमता तवर हे घाटशीळ मंदिर परिसरात अचानक बेशुद्ध होऊन पडले.
तत्परतेने दिले सीपीआर (CPR) आणि वाचले प्राण
घटनास्थळी उपस्थित महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) सुरक्षा जवान दीपक पोद्दार यांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने प्रसंगावधान राखले आणि संबंधित भाविकाला सीपीआर (CPR) दिले. या प्राथमिक उपचारांमुळे अनमता तवर यांना तातडीने शुद्ध आली. त्यानंतर एसआयएसपीएल (SISPL) च्या सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवत स्ट्रेचरच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रसंगी सुरक्षा पर्यवेक्षक योगेश फडके, शिवाजी ढवळे व इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.
मंदिर संस्थानच्या प्रशिक्षणाचे सार्थक
शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होण्यापूर्वी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने येथील सर्व सुरक्षा रक्षक तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सीपीआर देण्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या पूर्वतयारीचा आणि प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष प्रसंगी किती मोलाचा उपयोग होऊ शकतो, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जवान दीपक पोद्दार यांच्या या धाडसी आणि समयसूचक कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.







