Best News Portal Development Company In India

*संगणक अभियंता श्री. मोहन जाधव यांच्याकडून बोरमन तांडा शाळेला १०१ पुस्तकांची अनमोल भेट…!*

*संगणक अभियंता श्री. मोहन जाधव यांच्याकडून बोरमन तांडा शाळेला १०१ पुस्तकांची अनमोल भेट…!*
– – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ), दि. २७ ऑक्टोबर २०२६ : विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात आणि पुस्तकांच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उदात्त हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरमन तांडा येथे माजी विद्यार्थी तथा पुणे येथील संगणक अभियंता श्री. मोहन जाधव यांच्या वतीने शालेय ग्रंथालयासाठी १०१ पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेशी जपलेले नाते आणि शिक्षणाप्रती असलेली कृतज्ञता यांचे दर्शन घडवणारा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.

विशेष म्हणजे, यापूर्वीही स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर श्री. मोहन जाधव यांनी शाळेला १०१ पुस्तकांचा संच भेट देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपदेत मोलाची भर घातली होती. आता पुन्हा एकदा पुस्तकांची अनमोल भेट देत त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची आणि शाळेविषयीच्या आत्मीयतेची प्रचिती दिली आहे. त्यांच्या या ज्ञानदानाच्या कार्यामुळे शाळेच्या ग्रंथालयाची समृद्धी वाढण्यासोबतच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे.

श्री. मोहन जाधव यांच्या वतीने त्यांच्या ज्येष्ठ बंधू श्री. रतन जाधव यांनी पुस्तकांचा संच शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर कुमार चौधरी सर यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी जळकोट ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. कोटे साहेब, ग्रामविकास अधिकारी श्री. कांबळे साहेब, शिक्षणप्रेमी नागरिक श्री. प्रदीप जाधव, श्री. शंकर चव्हाण, श्री. बाबुराव राठोड, श्री. गुलाब राठोड, सहशिक्षिका श्रीमती राठोड मॅडम आणि सहशिक्षक श्री. कुंभार सर उपस्थित होते.

“पुस्तक हे केवळ ज्ञानाचे साधन नसून उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा प्रकाशमार्ग आहे.” या विचाराला कृतीतून साकार करणाऱ्या श्री. मोहन जाधव यांच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची नवी दालने खुली झाली आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमातून इतर माजी विद्यार्थ्यांनाही आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने सहकार्य करणाऱ्या श्री. मोहन जाधव व त्यांच्या कुटुंबीयांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india