‘गोकुळ’मध्ये एकहाती सत्तेचा डंका! आमदार सतेज (बंटी) पाटील यांचा कोल्हापुरात कवड्यांची माळ व तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन जंगी सत्कार!
तुळजापूर प्रतिनिधी:-
कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आणि सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला ऐतिहासिक विजय मिळवून देत एकहाती सत्ता आणल्याबद्दल आघाडीचे प्रमुख व काँग्रेसचे नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांचा कोल्हापुरात मोठ्या जल्लोषात नागरी सत्कार करण्यात आला.
या वेळी कार्यकर्त्यांच्या वतीने श्री क्षेत्र तुळजापूरच्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे छायाचित्र, मंदिरातील पवित्र प्रसाद आणि आई भवानीचा आशीर्वाद मानली जाणारी कवड्याची माळ परिधान करून आमदार बंटी पाटील यांचा भावूक व शाही सन्मान करण्यात आला.
सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा सिद्ध-
गोकुळ दूध संघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकवून सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या राजकारणात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील आपले मजबूत वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सत्कार प्रसंगी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘बंटी पाटील साहेब आगे बढो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
प्रमुख नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती-
या दिमाखदार सत्कार सोहळ्याला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज (भैय्या) पाटील, माजी नगरसेवक अमोल कोतवाल, सचिन घोगरे, अनंत गोरे यांच्यासह काँग्रेसचे विविध आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांच्या कुशल नेतृत्वाचे कौतुक करत गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून शेतकरी व दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास व्यक्त केला.






