”लाखो पगार तरीही लाच का? ‘अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती’तर्फे आरटीओ आणि पोलिसांच्या कथित रेट कार्डचा पर्दाफाश; धाराशिवमध्ये धडक मोर्चा!”
तुळजापूर प्रतिनिधी:-
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आरटीओ (RTO), ट्रॅफिक पोलीस आणि महामार्ग पोलिसांमधील कथित भ्रष्टाचाराविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला आहे. वाहनधारकांच्या तक्रारींचा पर्दाफाश करत समितीने चक्क महिनानिहाय कथित लाचेचे ‘रेट कार्ड’ जनतेसमोर आणले आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कथित ‘रेट कार्ड’ आणि वाहनधारकांची लूट-
पोस्टरमधील माहितीनुसार, आरटीओ इन्स्पेक्टर, ट्रॅफिक पोलीस आणि महामार्ग पोलिसांना लाखो रुपये पगार असूनही ते वाहनधारकांकडून विनाकारण त्रास देऊन मोठ्या प्रमाणात लाच घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पिकअप, ट्रक, टँकर, ट्रॅक्टरपासून ते अगदी डंपर व स्कूल बसपर्यंतच्या प्रत्येक वाहनावर प्रति महिना 1,000 रुपयांपासून ते तब्बल 15,000 रुपयांपर्यंतचा हप्ता आकारला जात असल्याचा दावा या पत्रकात करण्यात आला आहे. तसेच पकडलेल्या वाहनांवर, री-पासिंगसाठी आणि इतर विविध कामांसाठीही हजारो रुपयांची लाच मागितली जात असल्याचे यात नमूद केले आहे.
जनतेची हलाखीची स्थिती-
वाहनधारकांना बँकांकडून किंवा खासगी सावकारांकडून कर्ज काढून गाड्यांचे हप्ते भरावे लागतात. मात्र, पोलिसांच्या व आरटीओच्या सततच्या हप्ता वसुलीमुळे अनेक वाहनधारकांनी आपल्या गाड्या विकल्या असून काहींनी आत्महत्या केल्याचीही दुर्दैवी माहिती यामध्ये समोर आली आहे.
निषेध मोर्चा आणि जनआंदोलन-
भ्रष्टाचाराविरोधात वाहनधारकांना एकत्र आणण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे स्वातंत्र्य सेनानी प्रदीप पाटील खांडपूरकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. २८/१०/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता, आर टी ओ कार्यालयसमोर, धाराशिव येथे हलगी वाजवत निषेध मोर्चा व जनआंदोलन आयोजित करण्यात आले होते.
समितीची प्रमुख मागण्या-
लाचखोरीच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी.
आरटीओ, महसूल पोलीस व महामार्ग पोलीस विभागातील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी.
वाहन तपासणी, परमिट आणि इतर कामांमध्ये पारदर्शकता आणावी.
वाहनधारकांचा विनाकारण त्रास, धमकावणे आणि लाच मागणे तात्काळ थांबवावे.
तक्रार नोंदवण्यासाठी सुलभ आणि प्रभावी व्यवस्था निर्माण करावी.
या धडाकेबाज मोर्चात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी प्रदीप पाटील खंडापूरकर ( बाबा), पृथ्वीराज खंडापूरकर (राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य)धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश (भैय्या) पाटील, सारिका सुंगे(महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस), दत्ताभाऊ सोनवणे (मराठवाडा संपर्कप्रमुख), सुषमा शिंदे (धाराशिव जिल्हाध्यक्ष), धनाजी पात्रे (धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष), बालाजी जाधव (तुळजापूर तालुकाध्यक्ष), श्रीकांत गाटे(माजी सैनिक तालुकाध्यक्ष), बाळासाहेब पाटील (तालुका सरचिटणीस) आणि संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








