श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव: कर्नाटकच्या ‘बावगी पब्लिसिटी’ची सलग ४० वर्षे विनामूल्य साउंड सिस्टीम सेवा; मंदिर संस्थानकडून विशेष सत्कार!
तुळजापूर प्रतिनिधी:-
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या श्री क्षेत्र तुळजापूर येथे नुकत्याच अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या शारदीय नवरात्र महोत्सवात भक्ती आणि सेवेचा एक अनोखा आदर्श पाहायला मिळाला. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील प्रसिद्ध ‘बावगी पब्लिसिटी’च्या वतीने गेल्या ४० वर्षांपासून दरवर्षी अखंडपणे विनामूल्य ध्वनियंत्रणेची (साउंड सिस्टीम) सेवा पुरवली जात आहे.
अमित बावगी आणि गुरू बावगी यांच्या पुढाकारातून गेल्या चार दशकांपासून ही सेवा अविरतपणे सुरू आहे. शारदीय नवरात्र महोत्सवातील विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि महापूजा प्रसंगी मंदिर परिसरात अत्यंत उत्कृष्ट दर्जाची ध्वनियंत्रणा पुरवण्याचे काम बावगी पब्लिसिटी करत आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे नवरात्र महोत्सवाच्या भव्य आयोजनात आणि व्यवस्थापनात दरवर्षी मोलाचे योगदान मिळत आहे.
मंदिर संस्थानकडून सेवेचा गौरव
गेल्या ४० वर्षांच्या या अखंड भक्ती आणि सेवाकार्याची दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने बावगी पब्लिसिटी, गुलबर्गा येथील अमरित नाईकोडी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी मंदिर संस्थानचे मुख्य लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण, लेखापाल तेजस कऱ्हाळे, अभियंता सुधीर कदम तसेच मंदिर संस्थानचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
”देवीच्या चरणी सलग ४० वर्षे सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे परमभाग्य आहे,” अशी भावना या प्रसंगी बावगी पब्लिसिटीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.









