Best News Portal Development Company In India

कायद्याला गती, गुन्हेगारांना आवाहन; इज्जपवारांच्या नेतृत्वात धाराशिव पोलिसांचा दरारा

कायद्याला गती, गुन्हेगारांना आव्हान; इज्जपवारांच्या नेतृत्वात धाराशिव पोलिसांचा दरारा

धाराशिव | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र यांनी गुरुवार, दि. 26 डिसेंबर 2025 रोजी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट देत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रलंबित मालमत्ताविषयक व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांचा उलगडा अधिक गतीने करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीत जिल्ह्यातील विविध पथकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नळदुर्ग पोलीस ठाणे गु.र.नं. 430/2025 अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीस अटक केली. गुन्हे उघडकीस आणण्यात निरीक्षक इज्जपवार यांची तत्परता, अचूक तपास आणि समन्वयपूर्ण कार्यशैली याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच तुळजापूर येथील पिंक पथकाने गुप्त बातमीच्या आधारे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा मोठा मुद्देमाल जप्त करत प्रभावी कारवाई केली. वाशी पोलीस ठाण्याच्या पथकानेही गंभीर गुन्ह्यातील आरोपीस अटक करून तपासात महत्त्वपूर्ण यश मिळविले. आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले.
सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून तब्बल ४१ हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करून नागरिकांना दिलासा दिला. तर आनंदनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सन 2025 मधील ६३ मिसींग व्यक्तींचा शोध घेऊन उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
या सर्व उत्कृष्ट कार्याची दखल घेत मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र, मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बैठकीला पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात धाराशिव पोलिसांची कामगिरी अधिक प्रभावी होत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india