तब्बल १९ वर्षांनी भरली शाळा; नरेंद्र आर्य विद्यालयाच्या आठवणींना पुन्हा उजाळा
२००६ दहावी बॅचचा भावनिक स्नेहमेळावा; गुरूंचा सन्मान, मैत्रीचा उत्सव
तुळजापूर | प्रतिनिधी
“अरे ओळखलंस का?”, “काय करतोस आता?”, “दहावीनंतर कुठे गेलास?”
अशा अनेक प्रश्नांनी आणि हास्य, भावना व आठवणींनी मौजे आपसिंगा येथील नरेंद्र आर्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुन्हा एकदा गजबजले. तब्बल १९ वर्षांनंतर २००६ च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी व शिक्षक एकत्र आले आणि शाळेचे प्रांगण जणू आठवणींच्या उत्सवाने न्हाऊन निघाले.
नोकरी, व्यवसाय व संसाराच्या व्यापातून वेळ काढत लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे व हैदराबाद येथून सुमारे ५० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक या स्नेहमेळाव्यात सहभागी झाले होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकजण भावूक झाले.
गुरूंचा सन्मान; कृतज्ञतेची भावना
या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने मुख्याध्यापक जयराज सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित सर्व गुरूजनांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक बाळकृष्ण गोरे, तुकाराम गोरे, सुमित्रा खंदारे, शरद गोरे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या जडणघडणीत नरेंद्र आर्य विद्यालयाने दिलेल्या संस्कारांचे ऋण व्यक्त करत गुरुजनांविषयी आदरभाव प्रकट केला.
शाळेसाठी सौरऊर्जेवर चालणारा कॅमेरा भेट
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत सौरऊर्जेवर चालणारा सुरक्षा कॅमेरा शाळेस भेट देण्यात आला. हा उपक्रम विद्यालयाच्या सुरक्षिततेसह सामाजिक भान जपणारा ठरला.
जिलेबीने वाढवली स्नेहमेळाव्याची गोडी
मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ताई हजारे यांच्या वतीने उपस्थित सर्वांसाठी चपाती, पनीर, जिरा राईस, भजी, पापड व स्वीटमध्ये जिलेबी असा सुस्वाद्य भोजनाचा बेत ठेवण्यात आला. भावनिक वातावरणात जिलेबीच्या गोडव्याने पंगतही गोड झाली, अशी विनोदी टिप्पणी यावेळी करण्यात आली.
व्हॉट्सॲप ग्रुपमधून स्नेहमेळाव्यापर्यंतचा प्रवास
काही वर्षांपूर्वी तयार झालेल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संवाद वाढत गेला. यावर्षी एक महिना आधी तारीख निश्चित करून हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर सिरसाठ, अर्जुन गोरे, अमोल कांबळे, रेहान काझी, सौदागर गायकवाड, आशा हजारे, राणी तोडकरी, शुभांगी इंगळे, सुकुमार माने, सुषमा घोलकर, सुवर्णा जमदाडे, सारीका रोंगे, अश्विनी कुंभार, पल्लवी सगरे, श्रीदेवी गोरे, रेणुका अंदाने, अमरजा क्षीरसागर, उज्ज्वला खोचरे,
तसेच अजय सोनवणे, अविराज रोकडे (कामठा सरपंच), रामदास सरडे, नानासाहेब गादे, नागेश कोपे, शंभू पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
इतर बॅचसाठी प्रेरणादायी स्नेहमेळावा
हा स्नेहमेळावा सोशल मीडियावर चर्चेत आल्याने इतर बॅचचे माजी विद्यार्थीही अशा मेळाव्यांसाठी प्रेरित झाले आहेत. नरेंद्र आर्य विद्यालय हे केवळ शिक्षण देणारी संस्था नसून, आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या नात्यांची शाळा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.






