अवैध गांजा लागवडीवर मोठी कारवाई; ७३ लाखांचा मुद्देमाल जप्त
————————————————–
तुळजाई एक्सप्रेस (प्रतिनिधी)
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील धाकटेवाडी शिवारात अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर कृती विभाग (ANTF) यांनी गांजा लागवड करणाऱ्यांविरोधात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १४६ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून त्याची बाजार किंमत तब्बल ७३ लाख १३ हजार ५०० रुपये इतकी आहे.
दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स छ. संभाजीनगर कृती विभाग यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौ. धाकटेवाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव येथील शेतजमिनीत मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गांजाच्या झाडांची (कॅनॅबिस प्लांट) अवैध लागवड करण्यात आली आहे.
ही माहिती मिळताच एएनटीएफ पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. सदर माहितीची खातरजमा करून दि. १६/०२/२०२६ रोजी धाकटेवाडी शिवारातील शेत गट नं. ३८/१६३/२ येथे छापा टाकण्यात आला.
छापा कारवाई दरम्यान संबंधित शेतजमिनीत गांजा वनस्पतींची (कॅनॅबिस प्लांट) अवैध लागवड करून त्याची देखभाल व रखवाली करत असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करून सर्व लहान-मोठी गांजाची झाडे उपटून त्यांचे गठ्ठे बांधण्यात आले. त्यानंतर वजन केल्यानंतर एकूण १४६ किलो गांजाची झाडे सापडली.
या गांजाच्या झाडांची एकूण किंमत ७३,१३,५०० रुपये इतकी असून तो संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस ठाणे उमरगा, जिल्हा धाराशिव येथे अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संभाजीनगर कृती विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. दिपाली पाटील यांच्या फिर्यादीवरून एन. डी. पी. एस. कायदा १९८५ अन्वये कलम ८(क), २०(अ), ११(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. सदरची कारवाई ही अमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत मॅडम,पोलीस अधीक्षक अजित टिके,
श्री खाटमोडे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी साईनाथ ठोंबरे,पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे,पोलीस निरीक्षक श्रीमती दिपाली पाटील, सपोउनी वाहेद मुल्ला,हनुमान पुरके,हवालदार श्रीमती शैला टेळे ,सुरेश राऊत,नागेश केंद्रे, निलेश सरपाळे,कैलास गाडंकर, नितीन जाधव, रवींद्र साळवे, सुरज जोनवाल,ज्ञानेश्वर चव्हाण, हरिशचंद्र मुंडे,अमितसिंग ठाकूर, अतुल तुपे, आम्रपाली सूर्यवंशी, ज्योती कीर्तीकर, प्रियंका पवार आदींनी केली आहे.






