Best News Portal Development Company In India

अवैद्य गोवंशीय जनावरांची वाहतूक उघडकीस ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई !

अवैध गोवंशीय जनावरांची वाहतूक उघडकीस : स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
—————————————————-
नळदुर्ग (प्रतिनिधी) :
धाराशिव जिल्ह्यात अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत वाहनासह सुमारे ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर जनावरांच्या वाहतुकीवर मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ठिक १०.१० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवचे पोलीस निरीक्षक विनोद इंगळे (इंजपवार) हे आपल्या पथकासह वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पारा येथून फकराबादच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयित वाहनाबाबत माहिती मिळाली.या वाहनातून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांना आला.
संशयाच्या आधारे पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग करून चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा दिला.चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये अत्यंत दाटीवाटीने गोवंशीय जनावरे भरलेली आढळून आली. या जनावरांना कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा नव्हती, तसेच त्यांना अत्यंत अमानुष व त्रासदायक पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर वाहन चालकाकडे जनावरांबाबत सविस्तर चौकशी करण्यात आली.मात्र चालकाने जनावरे कोठून आणली आणि कुठे घेऊन जात होता याबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ सदर वाहन वाशी पोलीस ठाण्यात आणण्याचे आदेश दिले.
पोलीस ठाण्यात दोन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये चार गोवंशीय जनावरे आढळून आली. या जनावरांसह वाहनाची एकूण किंमत सुमारे ८,८०,००० रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत जनावरांची सुटका करण्यात आली असून त्यांना योग्य देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४/२०२६ नोंदवण्यात आला आहे.आरोपींविरुद्ध प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत कलम ११ (१) (डी), (ई), (एच) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(अ)(१) आणि ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बळीराम यादव, पोलीस स्टेशन वाशी हे करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार दयानंद गादेकर, पोलीस हवालदार बळीराम शिंदे, पोलीस अंमलदार पुष्कर मुगळे, पोलीस हवालदार सुभाष चौरे तसेच वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बळीराम यादव यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.अनेकदा अशा प्रकारे जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जाते,मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येत आहेत. जनावरांना अत्यंत अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याने प्राणी संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांनी देखील या कारवाईचे स्वागत केले असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी देखील नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून वेळीच कारवाई करता येईल.
दरम्यान, पोलिसांकडून जिल्हाभरात अवैध वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अवैध जनावर वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india