Best News Portal Development Company In India

*”शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे,, जो पितो तो गुरगुरतो”* – डॉ बाबासाहेब आंबेडकर !

*”शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे,, जो पितो तो गुरगुरतो”* – डॉ बाबासाहेब आंबेडकर

*मुरूम येथील डॉ आंबेडकर वाचनालयाच्या प्रेरणेतून भीमनगरने साधली प्रगती ; घडले उच्चपदस्थ अधिकारी*
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

*संविधानाचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारण,दलित हक्क,महिला सक्षमीकरण आणि कामगारांच्या कल्याणासाठी संपूर्ण हयात घालवली.शिक्षण,समता आणि बंधुत्वाचा पुरस्कार करत मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ऐतिहासिक लढा देत वंचित,शोषित समाजाला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली.बाबासाहेबांच्या पश्चात त्यांच्या नावाने देशभरात अनेक संस्था उभ्या राहिल्या मात्र बाबासाहेब हयात असतानाच 1955 साली मुरूम शहरातील भीमनगर भागात बाबासाहेबांच्या नावाने पाहिले सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले.”शिक्षण हे वघिणीचे दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही” असे बाबासाहेब नेहमी म्हणत.याच प्रेरणेने बाबासाहेबांच्या हयातीत त्यांच्या नावाने सुरू झालेले महाराष्ट्रातील हे पाहिले वाचनालय असावे.आज या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक युवकांनी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.*

 

मुरूम शहरातील भीमनगर या छोट्या दलित वस्तीने अनेक उच्चपदस्थ अधिकारी दिले आहेत.येथील तरुणांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातून वैद्यकीय,शैक्षणिक,इंजिनिअरिंग,पोलीस प्रशासन यासह गावपातळीपासून ते मंत्रालयापर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.या वाचनालयाच्या प्रेरणेतूनच मुरूमचे सुपुत्र लक्ष्मीकांत देशमुख यांनी 2018 साली बडोदे येथे पार पडलेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
पूर्वीच्या काळात गाव खेड्यातील दलित बहुल भागाकडे बघण्याचा एक नकारात्मक दृष्टीकोन होता.आता यामध्ये मोठा बदल झाला आहे.शिक्षणाचे महत्त्व ओळखून येथील तरुण मर्यादित साधनसामग्री,आर्थिक अडचण आणि सामाजिक प्रतिमा यावर मात करत डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातून जिद्दीने आणि चिकाटीने स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश संपादन करत प्रशासकीय सेवेत उतुंग भरारी घेत आहेत.भीमनगर वस्तीतील क्लास वन,क्लास टू अधिकाऱ्यांसह डॉक्टर, इंजिनिअर,प्राध्यापक, वकील, शिक्षक अशा वर्गाची आकडेवारी पाहता नकारात्मक प्रतिमा झुगारून शिक्षणाच्या जोरावर प्रगती साधता येते याचे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल.यामुळेच उमरगा तालुक्यातील न्हवे तर धाराशिव जिल्ह्यातील इतर कोणत्याही शहर आणि खेड्यातील दलित वस्त्यांपेक्षा मुरूम शहरातील भीमनगर शिक्षित आणि प्रगत म्हणून ओळखले जात आहे.या वस्तीने एक वेगळा ठसा उमटवला असून मुरूमच्या भीमनगरची ही यशोगाथा तालुक्यातील आणि जिल्ह्यातील विशेष करून दलित समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
*पिंपळे गुरुजींनी सुरू केली शैक्षणिक चळवळ*
स्वातंत्र्य काळात नांदेड जिल्ह्यातील गणपतराव पिंपळे गुरुजी हे मुरूम शहरातील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून रूजू झाले होते.गुरुजींनी भीमनगर भागात मोठ्या पोटतिडकीने शिक्षणाचा प्रसार सुरू केला.शाळा सुटल्यानंतर गुरुजी वृत्तपत्रे घेऊन लहान मुलां बरोबरच जेष्ठांना एकत्र करत पारावर बसून त्यांच्यासमोर पेपर वाचन करत.रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांच्या माध्यमातून देश आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींची विस्तृत माहिती सांगत शिक्षणाचे महत्त्व पटवून देत.पिंपळे गुरुजींनी खऱ्या अर्थाने भीमनगर भागात शिक्षणाचा प्रसार सुरू केला.त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या डॉ आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातून येथील तरुणांनी मोठी प्रगती साधली आहे.    *डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरू करण्यात यांचे योगदान*
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजाला शिक्षित आणि प्रगत करण्यासाठी पिंपळे गुरुजींच्या मार्गदर्शनाने भीमनगर येथील लाडप्पा सायबा गायकवाड,मारुती सायबा गायकवाड,एकनाथ महाराज,पांडुरंग भालेराव,शिवदास गायकवाड, गणपती लिंबाजी कांबळे,खंडू कांबळे यांनी एका लहान झोपडीवजा खोलीत 1955 साली बाबासाहेबांच्या हयातीतच डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सुरू केले.मुरूमचे सुपुत्र माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून आता वाचनालयाची भव्य अशी दुमजली इमारत उभी राहिली आहे.यापुढील काळातही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना या वाचनालयाचा मोठा फायदा होणार आहे.*वाचनालयाच्या माध्यमातून घडले वर्ग एकचे 13,वर्ग दोनचे 34 अधिकारी*
वाचनालयाच्या माध्यमातून भीमनगर मधून वर्ग 1 चे 13 तर वर्ग 2 चे 34 अधिकारी यासह 60 इंजिनिअर,16 डॉक्टर याबरोबरच प्राध्यापक,शिक्षक,वकील तयार झाले आहेत.यामध्ये निवृत्त साखर सहसंचालक डी आय गायकवाड,राजस्थान राज्यपालांचे ओएसडी राजकुमार सागर,अप्पर निबंधक राजेश सुरवसे,पोलीस उपायुक्त विजयकांत सागर,उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड,विक्रीकर उपायुक्त सुमेधकुमार गायकवाड,कार्यकारी अभियंता अण्णाराव कांबळे,बीपीसीएलचे चीफ मॅनेजर सिद्धेश्वर भालेराव,ऑर्थोपेडिक सर्जन डॉ प्रशांत कांबळे असे विविध पदावर कार्यरत असलेले अधिकारी आहेत.*अधिकाऱ्यांकडून मिळत आहे मार्गदर्शन*
डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या प्रेरणेने भीमनगर येथील दत्तात्रय गायकवाड हे पाहिले अधिकारी झाले.त्यांच्या यशाने युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.आणि येथूनच खऱ्या अर्थाने भीमनगरची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली.आज विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच निवृत्त झालेल्या मंडळींकडून नौकरीच्या संधी,स्पर्धा परिक्षेबाबत योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने येथील युवकांत स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण झाली आहे.वाचनालयाच्या माध्यमातून येथील प्रत्येक घरातील युवक उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करत असल्याने भीमनगर स्पर्धा परीक्षांचे केंद्र बनत आहे.

*कठीण परिस्थितीतुन शिक्षण घेत मी पहिला अधिकारी झालो.यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे खूप मोठे योगदान आहे.माझ्या यशाने सहकाऱ्यांना प्रेरणा मिळाली आणि तेही विविध शासकीय खात्यात रूजू झाले.आज या यशाने प्रेरित होऊन भीमनगर येथील युवक स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत हीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.* – डी आय गायकवाड (निवृत्त साखर सह संचालक)

*शिक्षणाचे महत्त्व ओळखून गणपतराव पिंपळे गुरुजींच्या मार्गदर्शनाने भीमनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरू झाले.यामुळे अनेक अधिकारी घडल्याने आज भीमनगरने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.वाचनालयामुळे तसेच अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने येथील युवक स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आहेत.* मदन गायकवाड (निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी)

*माझ्या जडणघडणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालयाचा बहुमूल्य वाटा आहे.माझ्या उत्कर्षाच्या प्रवासाचा साक्षीदार म्हणजे हे वाचनालय आहे. दररोज शाळा सुटल्यानंतर वाचनालयातील वृत्तपत्रे वाचणे आणि घरी वाचनासाठी पुस्तके घेऊन जाणे हा माझ्या त्यावेळच्या दैनंदिन जीवनातील अपरिहार्य भाग बनला होता.* – राहुल गायकवाड (उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी)

*मी 1965 ते 70 ला धाराशिव येथे राहत होतो.शेती मुरूम येथे असल्याने उन्हाळ्यात सुट्टी घालवण्यासाठी मुरूम गावी येत होतो.त्यावेळी मी वाचनालयात जाऊन पुस्तके वाचायचो.या वाचनातून माझी सामाजिक जाणिव विस्तारली आणि माझ्या लेखणीला अंकुर फुटले.खऱ्या अर्थाने माझ्या साहित्यिक होण्याचे श्रेय मुरूम येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालयाला आहे.* – लक्ष्मीकांत देशमुख (माजी अध्यक्ष अ भा म सा स बडोदा)

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india