जवळगा मे. येथे ‘जनता दरबार’ उत्साहात पार पडला; नागरिकांच्या समस्यांवर थेट चर्चा!
तुळजापूर प्रतिनिधी;- प्रशासनाचा कारभार थेट लोकांच्या दारी पोहोचवण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत जवळगा मे. (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे ‘जनता दरबार व आढावा बैठक’ अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत गावातील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि विकासकामांचा थेट आढावा घेण्यात आला.
या विशेष प्रसंगी पंचायत समिती प्रतिनिधी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
पंचायत समिती सदस्य: मा. वैभव मराठी, मा. किसन देडे.
माजी उपसरपंच दादासाहेब चौधरी, ग्रामपंचायत सदस्य देवानंद मस्के व इतर मान्यवर
विशेष उपस्थिती: आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री. बालाजी नन्नवरे
प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी: विस्तार अधिकारी, ग्रामसेवक वीनेश कांबळे, सर्व संबंधित खात्यांचे शासकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस.
ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जनता दरबारात गावातील नागरिक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी थेट गावात हजर राहिल्याने नागरिकांनी आपल्या मूलभूत समस्या आणि विविध योजनांसंदर्भातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडले.
उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत विविध प्रलंबित प्रश्नांवर त्वरित सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
”प्रशासनाचा गावगाडा लोकांच्या दारी” ही संकल्पना या जनता दरबाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरल्याची भावना यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली.







