दिल्लीतील लाठीहल्ल्याविरोधात तुळजापुरात तीव्र संताप; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सकाळी ११ वाजेपर्यंत कडकडीत ‘बंद’
तुळजापूर प्रतिनिधी:- दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात NEET पेपर फुटीप्रकरणी आणि आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व आंदोलक सोनम वांगचुक यांच्यासह उपोषणस्थळावरून विद्यार्थ्यांना बळाचा वापर करून हलवल्याच्या व आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तुळजापुरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेच्या विरोधात तुळजापुरातील सर्वपक्षीय संघटना, व्यापारी व सामाजिक संघटनांनी एकत्र येत तहसीलदारांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.
नेमकी काय आहे मागणी?
निवेदनात नमूद केल्यानुसार, NEET पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागी उच्चशिक्षित शिक्षणमंत्र्याची नियुक्ती करण्यात यावी. सोनम वांगचुक व विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या ऐकून घेण्याऐवजी हुकूमशाही पद्धतीने त्यांच्यावर लाठीहल्ला करून प्रशासनाने लोकशाहीच्या मूल्यांना हरताळ फासला आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
तुळजापुरात उत्स्फूर्त ‘लाक्षणिक बंद’
या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी तुळजापूर शहरातील समविचारी संघटना, जनहित संघटना, स्वराज्य संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठा आरक्षण आंदोलन संघटना, वंचित बहुजन आघाडी तसेच शहरातील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला. तुळजापुरात दर्शनासाठी येणाऱ्या भावीक भक्तांची कोणतीही अडचण होऊ नये, याची दक्षता घेत व्यापाऱ्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा न घेतल्यास भविष्यात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तुळजापुरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.
निवेदन देतेवेळी महेश गवळी, महेश जाधव, अजय (भैया) साळुंके, मिलिंद रोकडे, जीवन कदम, प्रशांत संजी, तेजस बोबडे, श्रीकांत वाघे, रवी साखरे, उत्तम नाना अमृतराव, अर्जुन साळुंके, अमर चोपदार, सुरेश चौधरी, नरेश पेंदे, शिवानंद शिंदे या मुख्य पदाधिकाऱ्यांसह अनेक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.








