तुळजापूरमध्ये जुन्या वादातून तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण; ७ जणांवर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :- वाद विकोपाला गेल्याने मागील भांडण सोडवल्याचा राग मनात धरून एका २६ वर्षीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉड, हातातील कडे, बेल्ट आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर येथे घडली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष रविंद्र देडे (वय २६, मूळ रा. आनंदनगर, आंबेडकर चौक, लातूर; सध्या रा. तुळजापूर खुर्द, जि. धाराशिव) यांनी यासंदर्भात तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिनांक १९ जुलै २०२६ रोजी रात्री १०:०३ ते ११:३० वाजेच्या सुमारास मोर्डा कडे जाणाऱ्या रोडवरील उड्डाणपुलाच्या बोगद्याजवळ व तुळजापूर खुर्द येथे ही घटना घडली.
आरोपी राहुल जगताप, चेतन जगताप, बालाजी वटणे (सर्व रा. तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार अज्ञात इसमांनी मिळून फिर्यादी आशिष देडे यांना गाठले. “तू मागील भांडण का सोडवले?” असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली.
त्यानंतर संतापलेल्या आरोपींनी लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने तसेच हातातील कडे आणि बेल्टने आशिष यांना अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात आशिष देडे गंभीर जखमी झाले असून आरोपींनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर फिर्यादी आशिष देडे यांनी २२ जुलै २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात जाऊन आपबिती सांगत प्रथम खबर (FIR) दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी आरोपी राहुल जगताप, चेतन जगताप, बालाजी वटणे आणि इतर चार जणांविरुद्ध:
भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे: ११७(२), ११८(१), २९६, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५)
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (Atrocities Act): कलम ३(१)(आर), ३(१)(एस)
अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.






