Best News Portal Development Company In India

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उद्या उमरग्यात शांतता मोर्चा व प्रतीकात्मक उपोषण*

*विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उद्या उमरग्यात शांतता मोर्चा व प्रतीकात्मक उपोषण*

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

NEET परीक्षेतील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ, दिल्ली येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जाचा निषेध करण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता उमरगा येथे भव्य शांतता मोर्चा व प्रतीकात्मक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, साऊ एकल महिला समिती तसेच उमरगा-लोहारा परिसरातील विविध समविचारी सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सदर मोर्चा हुतात्मा स्मारक, उमरगा येथून सकाळी ११.०० वाजता प्रारंभ होऊन शांततेत घोषणाबाजी करीत नगर परिषद, उमरगा समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाणार आहे. त्यानंतर तेथे दुपारी २.०० वाजेपर्यंत प्रतीकात्मक उपोषण करण्यात येणार असून, त्यानंतर आंदोलनाचा समारोप होणार आहे.

“हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, शिक्षणातील पारदर्शकतेचा, समान संधीच्या अधिकाराचा आणि लोकशाहीतील शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा आहे,” असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या आंदोलनात उमरगा-लोहारा परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती तसेच सर्व समविचारी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला नैतिक बळ द्यावे, असे आवाहन रेखाताई पवार (जिल्हाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, धाराशिव), प्रा. राजू बटगिरे (अध्यक्ष, ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा) तसेच विजय जाधव (काका), साऊ एकल महिला समिती यांनी केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india