Best News Portal Development Company In India

अंधश्रद्धा निर्मूलनापासून व्यसनमुक्तीपर्यंत समाज परिवर्तनाचा ध्यास; मारुती बनसोडे यांचे ३८ वर्षांचे अविरत कार्य,*

*अंधश्रद्धा निर्मूलनापासून व्यसनमुक्तीपर्यंत समाज परिवर्तनाचा ध्यास; मारुती बनसोडे यांचे ३८ वर्षांचे अविरत कार्य,*

*पोतराज प्रथा निर्मूलन, विज्ञानवादी विचारांचा प्रसार आणि वंचितांच्या पुनर्वसनासाठी उल्लेखनीय योगदान*
————————————
समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि व्यसनाधीनतेविरुद्ध गेली तब्बल ३८ वर्षे सातत्याने संघर्ष करत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभारणारे नळदुर्ग येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव *मारुती बनसोडे* यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, बाल संरक्षण आणि वंचित घटकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना जिल्ह्यासह राज्यभरात विशेष ओळख मिळाली आहे.
सन १९९६ मध्ये परिवर्तन सामाजिक संस्थेची स्थापना करून त्यांनी तुळजापूर, लोहारा, परंडा आणि कळंब तालुक्यांत विविध सामाजिक उपक्रम राबविले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे.
*मारुती बनसोडे* यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त १९९०-९१ मध्ये त्यांनी १०१ व्याख्यानांचा संकल्प केला होता. मात्र समाजप्रबोधनाच्या ध्यासातून त्यांनी तब्बल ११७ व्याख्याने देत विज्ञानवादी विचारांचा प्रचार-प्रसार केला. त्यांच्या या कार्यामुळे धाराशिव व लातूर परिसरात अंधश्रद्धांविरोधात जनजागृतीची चळवळ बळकट झाली.
पोतराज प्रथा निर्मूलनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. ४ ऑगस्ट १९९६ रोजी तुळजापूर येथे मराठवाडास्तरीय निर्धार परिषद आयोजित करून १५२ बाल पोतराजांना या अनिष्ट प्रथेतून मुक्त करण्यात आले. त्यांचे पुनर्वसन, शिक्षण आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला.
विशेष म्हणजे, लहानपणी स्वतः “खंडोबाचे वारू” म्हणून अर्पण झालेल्या *मारुती बनसोडे* यांनी शिक्षण आणि प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेच्या जोखडातून स्वतःची मुक्तता करून समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.
व्यसनमुक्ती क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे धाराशिव जिल्हा संघटक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक व्यसनमुक्ती शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि युवकांसाठी समुपदेशन कार्यक्रम राबविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार त्यांना मिळाला असून या पुरस्कारासाठी धाराशिव जिल्ह्यातून निवड झालेले ते एकमेव समाजसेवक ठरले आहेत.
महिला बचत गटांची उभारणी, विधवा व निराधार महिलांचे प्रश्न, बाल संरक्षण, शेतकरी हिताचे प्रश्न, पंचायतराज जनजागृती, पौष्टिक तृणधान्य अभियान तसेच विविध सामाजिक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. तुळजापूर तालुका बाल संरक्षण समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक योगदानाची दखल घेत संविधान विचार मंच, बारामती यांच्या वतीने त्यांना “भीमपुत्र आयडॉल-२०२५” या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
समाजातील अंधश्रद्धा दूर करून विज्ञाननिष्ठ विचार रुजविणे, अनिष्ट प्रथांविरोधात संघर्ष करणे आणि वंचितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे, हा *मारुती बनसोडे* यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळेच ते आज धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील प्रेरणादायी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत.२७ जुलै हा त्यांचा अभिष्टचिंतन दिवस,आजच्या दिनी परममित्र सहकारी, मार्गदर्शक *मारुती बनसोडे* यांना लाखमोलाच्या शुभेच्छा!

*दयानंद काळुंके*
*पत्रकार अणदूर ता तुळजापूर*

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india