श्री तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धार व विकासकामांच्या अनुषंगाने गुरुपौर्णिमेपासून विशेष मंत्रपठण विधीचा शुभारंभ!
तुळजापूर प्रतिनिधी;- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धार व विकासकामांना धार्मिक अधिष्ठान लाभावे तसेच ही सर्व कामे निर्विघ्न, सुरळीत व यशस्वीरीत्या पूर्ण व्हावीत, या उद्देशाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे गुरुपौर्णिमेपासून विशेष मंत्रपठण विधीचा शुभारंभ करण्यात येत आहे. यामध्ये गणपती अथर्वशीर्ष पारायण, श्रीरुद्र जप तसेच दुर्गा सप्तशती पारायण हे धार्मिक विधी संपन्न होणार आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), धार्मिक व्यवस्थापक, महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष तसेच सरकारी उपाध्ये यांच्या बैठकांमध्ये ठरविल्यानुसार विशेष मंत्रपठण विधीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
दि. २९ जुलै २०२६ (बुधवार) रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. गुरुपौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या या विशेष मंत्रपठण विधीसाठी तिन्ही पुजारी मंडळातर्फे प्रत्येकी एक यजमान सहभागी होणार आहे. सकाळी ७ ते ८ या वेळेत उजव्या सोंडेच्या श्री गणपतीच्या अभिषेकासाठी उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो हे यजमान म्हणून उपस्थित राहतील.
त्यानंतर सकाळी ८ ते ९ या वेळेत भवानी-शंकर मंदिरात रुद्राभिषेक संपन्न होणार असून, त्यासाठी पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे हे यजमान म्हणून उपस्थित राहतील.
तसेच श्री तुळजाभवानी देवींच्या अभिषेक व संकल्प विधीसाठी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम हे यजमान म्हणून उपस्थित राहतील.
श्री देवींचे मळवट चोपल्यानंतर तिन्ही यजमान श्री तुळजाभवानी देवींची महाआरती करतील. त्यानंतर सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर श्री गणेश विहार येथे उपस्थित ब्राह्मणवृंदांना विधीवत वर्णी देण्यात येईल.
श्री तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धार व विकासकामे सुरळीत, निर्विघ्न व यशस्वीरीत्या पूर्ण व्हावीत याकरिता परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री भारती तीर्थ महासन्निधानम्, शृंगेरी शारदा पीठ यांचे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यांनी सुचविलेल्या धार्मिक विधी बाबत विश्वस्त मंडळ, प्रशासन, महंत व तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष या सर्वांच्या विचारविनिमयानंतर वरील प्रमाणे कार्यवाही पार पाडली जाणार आहे.






