Best News Portal Development Company In India

उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरण : ‘प्रश्न विचारताच हालचाली सुरू’; ऍड. शीतल चव्हाण यांनी केली निष्पक्ष चौकशीची मागणी*

*उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरण : ‘प्रश्न विचारताच हालचाली सुरू’; ऍड. शीतल चव्हाण यांनी केली निष्पक्ष चौकशीची मागणी*

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि. ४ ऑगस्ट : उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथील कथित विनयभंग, खंडणी मागणी आणि धमकी प्रकरणात अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित होत असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पुराव्यावर आधारित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. शीतल चव्हाण यांनी केली आहे. कोणत्याही एका बाजूचा निष्कर्ष काढण्यापूर्वी सत्य समोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ॲड. चव्हाण यांनी सांगितले की, कथित घटना दि. २० जुलै २०२६ रोजी घडल्याचे सांगितले जात असताना, संबंधित FIR मात्र दि. २८ जुलै २०२६ रोजी, म्हणजे आठ दिवसांनंतर नोंदविण्यात आला. विनयभंगासारख्या गंभीर आरोपाच्या प्रकरणात तक्रार नोंदविण्यास विलंब का झाला, हा पहिला प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्यानंतर FIR मधील मजकूर समोर आला. त्यामध्ये दोन आरोपींपैकी एका आरोपीने “उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड माझ्या नातेवाईक आहेत. तुमची चौकशी लावतो, तुम्हाला बडतर्फ करतो,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मात्र, दि. १ ऑगस्ट रोजी दैनिक लोकमतमध्ये वैद्यकीय अधीक्षक यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या खुलाशात “डॉ. रेखा गायकवाड यांचा या घटनेशी कोणताही संबंध नाही,” असे नमूद करण्यात आले. हा खुलासा वाचल्यानंतर आपण सोशल मीडियावर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले असल्याचे ॲड. चव्हाण यांनी सांगितले.

त्यामध्ये घटना आणि FIR मधील विलंब, महिला आरोग्य अधिकाऱ्यावर कथित विनयभंगासारखा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप असतानाही वैद्यकीय क्षेत्रातून साधा निषेध किंवा सार्वजनिक प्रतिक्रिया का उमटली नाही, तसेच FIR मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव आरोपीने वापरल्याचा आरोप असताना नंतर वर्तमानपत्रातून स्वतंत्र खुलासा देण्याची आवश्यकता का भासली, हे प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.

ॲड. चव्हाण यांनी सांगितले की, त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, त्यानंतर ‘धाराशिव लाईव्ह’नेही या विषयावर वृत्त प्रसिद्ध केले.

यानंतर घडलेल्या घडामोडींकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर वैद्यकीय क्षेत्राच्या शांततेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तक्रारदार वैद्यकीय अधीक्षक यांनी सामाजिक संघटनांना सहकार्याचे आवाहन केले. त्यानंतर दि. ४ ऑगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), उमरगा यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर करून निष्पक्ष चौकशी, डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आणि राजकीय किंवा इतर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये, अशी मागणी केली.

IMA ची भूमिका स्वागतार्ह असल्याचे सांगतानाच, राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप हा तक्रारदार किंवा आरोपी अशा कोणत्याही बाजूने होऊ नये, अशी भूमिका ॲड. चव्हाण यांनी मांडली. तपास केवळ पुरावे, साक्षी आणि कायद्याच्या आधारे व्हावा. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत तक्रारदार यांना रुग्णालय, तेथील कर्मचारी, संभाव्य साक्षीदार आणि तपास प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचाही विचार केला जावा, अशी त्यांनी सूचना केली.

या प्रकरणाला आणखी एक संवेदनशील पैलू असल्याचे सांगताना ॲड. चव्हाण म्हणाले की, तक्रारदार आणि आरोपी हे एकाच गावातील असून, त्यांच्यामध्ये यापूर्वी शेतरस्त्याच्या खाजगी वादावरून न्यायालयीन प्रकरणे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात वैयक्तिक वादाची पार्श्वभूमी असल्याचीही चर्चा असून, त्यामुळे तपास अधिक वस्तुनिष्ठ आणि सखोल होणे आवश्यक आहे.

“जर तक्रारदारांनी केलेले आरोप खरे असतील, तर आरोपींना तात्काळ आणि कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मात्र, दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी किंवा लोकहिताचे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असतील, तर अशा प्रकारे कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवरही तितकीच कठोर कारवाई झाली पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

“ना आरोपींची बाजू, ना तक्रारदारांची बाजू… माझी बाजू फक्त सत्याची आहे,” असे सांगत ॲड. शीतल चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक आणि पुराव्यावर आधारित चौकशी करण्याची मागणी केली. तसेच कोणताही राजकीय, प्रशासकीय किंवा सामाजिक दबाव न आणता दोषी कोणताही असो त्याच्यावर कारवाई व्हावी आणि निरपराध व्यक्तीला न्याय मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india