🚩 २९ ऑगस्टच्या उपोषणापूर्वी तुळजापुरात शक्तीप्रदर्शन! मनोज जरांगे पाटलांचे आई तुळजाभवानीच्या नगरीत आगमन; मनसेतर्फे भव्य सत्कार!
तुळजापूर प्रतिनिधी:- मराठा आरक्षणाच्या लढ्यात गरजवंत मराठ्यांचे बुलंद व्यासपीठ बनलेले संघर्षयोद्धा मा. मनोज (दादा) जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. येत्या २९ ऑगस्ट २०२६ पासून त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन तुळजापूर नगरीत मुक्कामासाठी आगमन झाले. तुळजापुरात आगमन होताच मराठा बांधवांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि ‘जय शिवराय’ च्या जयघोषात त्यांचे अभूतपूर्व व जल्लोषात स्वागत केले.
मनसे पदाधिकाऱ्यांकडून जरांगे पाटलांचा विशेष सत्कार
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या या तुळजापूर मुक्कामादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने त्यांची विशेष सदिच्छा भेट घेण्यात आली. मनसेचे जिल्हाध्यक्ष माननीय महेश जाधव, विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, तालुका सचिव धनाजी साठे आणि उपस्थित इतर मनसैनिकांनी पुष्पगुच्छ देऊन जरांगे पाटलांचा अत्यंत आदराने सत्कार केला.
आई तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन पश्चिम महाराष्ट्र दौरा!
आपल्या या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन आणि आशीर्वाद घेणार आहेत. देवीच्या आशीर्वादाने आणि तुळजापूरकरांच्या प्रेमाने ते उद्या पुढील पश्चिम महाराष्ट्राच्या झंझावाती दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
या प्रसंगी तुळजापूर परिसरातील हजारो मराठा बांधव, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जरांगे पाटलांच्या या आगमनामुळे संपूर्ण तुळजापूर शहरात आणि मराठवाड्यात शिवमय व लढवय्ये वातावरण निर्माण झाले आहे.








