महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका! मनसेच्या निवेदनानंतर तुळजापूर पोस्ट ऑफिसमध्ये सुरू झाले ‘विशेष काउंटर’!
अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती; शेतकरी, महिला व ज्येष्ठांची गर्दीतून होणार सुटका.
तुळजापूर प्रतिनिधी :- तुळजापूर पोस्ट ऑफिसमध्ये सध्या शासकीय योजनांचे अनुदान जमा झाल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे यांच्या टपाल विभागाला तातडीने निवेदन देऊन नागरिकांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधण्यात आले होते. मनसेच्या या आक्रमक भूमिकेचा सकारात्मक परिणाम झाला असून, प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत पोस्ट ऑफिसमध्ये विशेष काउंटर सुरू केले आहे.
सध्या पीएम-किसान (PM-Kisan), पीक विमा (Crop Insurance) आणि विविध शासकीय योजनांचे अनुदान लाभार्थी नागरिकांच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहे. ही रक्कम काढण्यासाठी दररोज तुळजापूर पोस्ट ऑफिसमध्ये नागरिक व शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होत होती. पुरेशा सुविधांभावी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.
या समस्येचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ०४ ऑगस्ट २०२६ रोजी पोस्ट ऑफिस प्रशासनाला निवेदन देऊन अतिरिक्त व्यवस्था करण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती.
मनसेच्या निवेदनाची गंभीर दखल घेत तुळजापूर उप डाक पाल (Postmaster) यांनी अधिकृत पत्र प्रसिद्ध करून खालील महत्त्वपूर्ण निर्णय लागू केल्याचे स्पष्ट केले आहे:
विशेष काउंटरची सुरुवात: गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये स्वतंत्र ‘विशेष काउंटर’ (Special Counter) सुरू करण्यात आले आहे.
अतिरिक्त कर्मचारी नियुक्त- या विशेष काउंटरवर कामकाज सुरळीत आणि जलद गतीने व्हावे, यासाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्राधान्य – शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची (वृद्ध) कामे प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
“नागरिक आणि शेतकऱ्यांची टपाल कार्यालयात होणारी पायपीट आणि मनस्ताप थांबवण्यासाठी मनसेने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. प्रशासनाने तात्काळ पावले उचलत विशेष काउंटर व अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यातही लोकहिताच्या प्रश्नांवर मनसे अशीच ठाम भूमिका घेत राहील. — मनसे पदाधिकारी
प्रशासनाने मनसेच्या मागण्या मान्य करून तातडीने कार्यवाही केल्यामुळे तुळजापूर परिसरातील शेतकरी, महिला व नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले आहेत.







