Best News Portal Development Company In India

बीड जिल्ह्याचा विकास आणि जनतेच्या हक्कांसाठी कटिबद्ध – आमदार बसवराज पाटील!

बीड जिल्ह्याचा विकास आणि जनतेच्या हक्कांसाठी कटिबद्ध – आमदार बसवराज पाटील!
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत धाराशिव – बीड – लातूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून ऐतिहासिक विजय मिळवणारे बसवराज पाटील यांचा आष्टी येथील ‘अद्वैतचंद्र’ मैदानात आमदार सुरेश धस यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्यात जाहीर सत्कार करण्यात आला. अत्यंत आत्मीय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात सत्कार स्वीकारल्यानंतर, बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा पुनरुच्चार आमदार बसवराज पाटील यांनी केला. निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देताना पाटील म्हणाले की, बीड जिल्ह्यातील महायुतीतील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी विजयासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. विशेषतः बीड जिल्ह्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी विजयाचे शिल्पकार म्हणून विशेष प्रयत्न केले आणि विजयश्री खेचून आणला.
“राजकारणात मैत्री, सहकार्य, विश्वास आणि आपुलकीची नाती जपणे हीच लोकशाहीची खरी ताकद आहे,” असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
या दिमाखदार सोहळ्याचे अध्यक्षपद माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रकाश सोळंके यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री बदामराव पंडित उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांकडून अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये मराठवाड्यातील जलसिंचनाचा प्रश्न मार्गी लावून मराठवाडा पाणीदार करण्याचे आवाहन आमदार प्रकाश सोळंके यांनी केले, तर शहरी भागातील शेतकऱ्यांनाही राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, अशी आग्रही मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. याशिवाय, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना मानधन मिळावे, अशी महत्त्वाची मागणी माजी समाज कल्याण सभापती बाबुराव पोटभरे यांनी मांडली. उपस्थितांच्या या सर्व मागण्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही नवनिर्वाचीत विधान परिषद सदस्य बसवराज पाटील यांनी दिली.
या सोहळ्याला स्वरूपसिंह हजारी, सहल चाऊस, राजाभाऊ मुंडे, रणवीर पंडित, बीड नगराध्यक्षा प्रेमलाताई पारवे, वडवणी नगराध्यक्ष शेषेराव जगताप, धारूर नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिरूर नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर, पाटोदा नगराध्यक्ष राजू जाधव, आष्टी नगराध्यक्ष जिया बेग आणि केज नगराध्यक्षा संगिताताई बनसोडे, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, विठ्ठलराव बदोले, गोविंदराव पाटील, रामराव गीते, हरून इनामदार, मोईन मास्टर, विश्वनाथ हुले, भाऊसाहेब नाटकर, सारिका शिरसाट, भाजपचे मंडळध्यक्ष रमेश गावडे, अनिल ढोबळे, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक, भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आमदार बसवराज पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. सत्कार सोहळा संपल्यानंतर आमदार सुरेश धस यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाची मेजवानी आयोजित करण्यात आली होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india