शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा १२ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न !
डोंबिवलीत मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांसह वर्धापनदिन सोहळा
डोंबिवली, १६ ऑगस्ट २०२६ : अन्याय-अत्याचाराविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत समाजातील विविध घटकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘शब्द खड्ग’ डिजिटल वृत्तपत्राचा १२ वा वर्धापनदिन डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी विद्यालयात रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
‘शब्द खड्ग’चे संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांपासून हे डिजिटल वृत्तपत्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत विविध सामाजिक विषयांना वाचा फोडत आहे. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, पोलीस, महिला पोलीस, शिक्षक, तृतीयपंथीय, कलाकार, लेखक, कवी, आरोग्य क्षेत्र, नवनिर्मिती करणारे व्यक्ती तसेच समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना ‘शब्द खड्ग’ने सातत्याने स्थान दिले आहे.
गुन्हेगारी, अन्याय-अत्याचाराच्या घटना, व्यक्ती व संस्थांचा परिचय, कविता, लेख, संपादकीय, आरोग्यविषयक माहिती, पाककृती, ‘जावे म्हणींच्या गावा’, ‘मनातले पान’, ‘माझी फोटोग्राफी’ अशा विविध सदरांमधून वाचकांशी नाते जोडत ‘शब्द खड्ग’ने पत्रकारितेबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गाणे, वक्तृत्व, अभिनय, लेखन, पत्रकारिता यांसारख्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे कामही वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात अलका बिर्जे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी ‘शब्द खड्ग’च्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी संपादक प्रा. दिपक जाधव यांचे अभिनंदन केले.
या वर्धापनदिन सोहळ्यात व्यंकटेश नायडू यांची ‘शब्द खड्ग’चे विशेष प्रतिनिधी, तर सुजित गुप्ता यांची फोटोग्राफर म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल उपस्थितांनी दोघांचेही अभिनंदन केले.
१२ व्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर उपस्थितांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उपस्थित माता-भगिनींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दिनकर सोमासे आणि निलेश गायकवाड यांनी ‘शब्द खड्ग’चे संपादक प्रा. दिपक जाधव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन खरात होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनकर सोमासे, निलेश गायकवाड, अश्विन केळकर, साईली बनसोडे, सुनील बनसोडे, कल्पना बनसोडे, मनीषा ताई, लता जाधव, बाबू जाधव, शिवाजी जाधव, डॉ. उदयराज तळेकर, रवींद्र शिंदे, मेघना मिश्रा, हंसू अली, सरबर अली, सानिका जाधव, निर्मिती सावरकर, अलका बिर्जे, नेहा बिर्जे, आकांक्षा बिर्जे, ज्योती खडपे, मंगल पाटील, चव्हाण काका-काकू, साऊंडवाले नवनाथ म्हात्रे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कांबळी सर, शिंदे मावशी तसेच मित्र परिवाराने विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नितीन खरात, रमेश गभाले, कल्पना बनसोडे, ज्ञानेश्वर मराठे, संदीप उबाळे, निलेश गायकवाड, नेहा बिर्जे आणि प्रा. दिपक जाधव यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गीत-संगीताच्या रंगतदार वातावरणामुळे वर्धापनदिन सोहळ्याला विशेष रंगत आली.
विशेष म्हणजे, ‘शब्द खड्ग’ डिजिटल वृत्तपत्राला १५ ऑगस्ट रोजी १२ वर्षे पूर्ण झाली. मात्र १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन असल्याने सर्वांना सोयीस्कर व्हावे म्हणून वर्धापनदिनाचा कार्यक्रम १६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला.
या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामध्ये दिनकर सोमासे, साईली बनसोडे, शिवाजी जाधव आणि बाबू जाधव यांचा सिंहाचा वाटा राहिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः प्रा. दिपक जाधव यांनी केले.
गेल्या बारा वर्षांच्या वाटचालीत समाजातील सर्वसामान्यांचा आवाज बनलेल्या ‘शब्द खड्ग’ने पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली असून, आगामी काळातही अन्याय-अत्याचाराविरोधातील आपली निर्भीड भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार या वर्धापनदिन सोहळ्यातून अधोरेखित झाला.









