तुळजापुरात माजी खासदार राजू शेट्टींचे भव्य स्वागत; धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत शेतकरी प्रश्नांवर रणनीतीवर चर्चा!
तुळजापूर प्रतिनिधी :-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी हे हिंगोलीहून कोल्हापूरकडे प्रवास करत असताना सोमवारी (१७ ऑगस्ट) तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे थांबले. या प्रसंगी विविध संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त व भव्य स्वागत केले.
तुळजापूर येथील या भेटीदरम्यान राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न आणि संघटनेची आगामी आंदोलनात्मक भूमिका यावर सखोल चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकरी प्रश्नांची सद्यस्थिती राजू शेट्टी यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावर बोलताना राजू शेट्टी यांनी शेतकरी हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावी व आक्रमकपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष तानाजी पेंदे, तालुकाध्यक्ष दुर्वास भोजने, राजेंद्र हाके, सतीश पांडे, प्रवीण कदम यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







