*ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे नागरी समस्यांवर उपाययोजनांसाठी नगर परिषदेला सात पानी निवेदन*
*‘स्वच्छ उमरगा • सुंदर उमरगा • हरीत उमरगा’ महाअभियानाचे चौथे सत्र; प्रत्यक्ष पाहणीत आढळलेल्या व नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचा प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा*
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ उमरगा • सुंदर उमरगा • हरीत उमरगा’ महाअभियानाच्या चौथ्या सत्रात सोमवारी (दि. 17) उमरगा शहरातील विविध नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी नगर परिषदेला सात पानांचे सविस्तर निवेदन देण्यात आले. अभियानाच्या पहिल्या तीन सत्रांत शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी, श्रमदान, जनजागृती व नागरिकांशी संवाद साधताना निदर्शनास आलेल्या समस्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
दि. 15 व 16 ऑगस्ट रोजी अभियानांतर्गत बालाजी मंदिर, हनुमान मंदिर, हमीद नगर, डॉ. गणेश नगर, काळे प्लॉट, जुनी पेठ येथील महात्मा बसवण्णा मंदिर परिसरासह विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी कचरा संकलन गाडी नियमित न येणे, नाले-गटारींची नियमित सफाई न होणे, नाल्यातून काढलेली घाण वेळेवर न उचलणे, डुकरे व मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, दूषित व गढूळ पाणीपुरवठा अशा समस्या मांडल्या.
विशेषतः मौलाना आझाद चौक ते काळे प्लॉट रस्त्याची दुरवस्था, रस्त्यालगतचा मोठा नाला तुंबलेला असणे, पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर व लगतच्या घरांमध्ये जाणे, पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनजवळ सांडपाणी साचणे तसेच या मार्गावर पुरेशा पथदिव्यांचा अभाव याकडे निवेदनातून नगर परिषदेचे लक्ष वेधण्यात आले आहे. हा मार्ग पादचारी, दुचाकीस्वार तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनल्याने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील डुकरांच्या उपद्रवाचा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. शहर वराहमुक्त करण्यासंदर्भात यापूर्वी देण्यात आलेल्या आश्वासनानंतरही अनेक भागांत डुकरांचा उपद्रव कायम असल्याने ठोस कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
तसेच शहरातील काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरमुळे दिव्यांग व्यक्तींच्या सुधारित वाहनांना तसेच ज्येष्ठ नागरिक व इतर वाहनचालकांना होणाऱ्या अडचणींचाही निवेदनात समावेश करण्यात आला असून, अशा स्पीड ब्रेकरची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाअभियानाचा उद्देश केवळ स्वच्छता मोहीम राबविणे किंवा समस्या निदर्शनास आणण्यापुरता मर्यादित नसून, नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची प्रशासनाकडे लेखी नोंद करून त्यांचे निराकरण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणे हा असल्याचे फाउंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
“नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतानाच नगर परिषद प्रशासनालाही त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. अभियानादरम्यान आढळलेल्या समस्यांचे प्रत्यक्ष निराकरण होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील. निवेदनानंतरही ठोस कार्यवाही न झाल्यास शांततामय व संविधानिक मार्गाने पुढील भूमिका घेतली जाईल,” असे ॲड. शीतल चव्हाण यांनी सांगितले.
‘स्वच्छ उमरगा • सुंदर उमरगा • हरीत उमरगा’ हे केवळ घोषवाक्य न राहता शहरात प्रत्यक्ष बदल दिसावा, यासाठी नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाची जबाबदारी या दोन्हींचा समन्वय आवश्यक असल्याची भूमिका फाउंडेशनने मांडली आहे.
निवेदन प्रातिनिधिक स्वरूपात ऍड. अर्चना जाधव, किशोर बसगुंडे, प्रदीप चौधरी, बबीता मदने, मयूर कटके या स्वयंसेवकांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना सादर केले.






