५ कोटींचा विकासनिधी परत पाठवण्याचा घाट घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना काँग्रेसचा इशारा; १५ दिवसांत कामे सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम!
तुळजापूर प्रतिनिधी :-
नगर विकास खात्याकडून तुळजापूर शहराच्या विकासासाठी मंजूर झालेला ५ कोटी रुपयांचा निधी नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या राजकारणामुळे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविरोधात काँग्रेस नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली असून गटनेते अमोल कुतवळ यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन नगर परिषद प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना जोरदार इशारा दिला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक ७, ८, ९ आणि १० मधील नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी ५ कोटींचा विकासनिधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून पार पडणाऱ्या कामांची जबाबदारी बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आली होती. काँग्रेस नगरसेवकांनी ३० जून रोजी शहरातील विविध ३६ मूलभूत कामांचे निवेदन दिले होते, ज्यापैकी २८ कामांना मंजुरी मिळून निधीची सोय झाली आहे.
परंतु, गेल्या १० ते १५ वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या या प्रभागांमधील कामे रोखण्यासाठी सत्ताधारी आणि नगराध्यक्ष सूडबुद्धीने राजकारण करत असून हा ५ कोटींचा निधी परत पाठवण्याचा कट रचत असल्याचा थेट आरोप गटनेते अमोल कुतवळ यांनी पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेतील मुख्य मागण्या व इशारा:
कामांचे स्पष्ट वेळापत्रक द्या: मंजूर झालेली विकासकामे प्रत्यक्ष कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण होणार, याचे लेखी वेळापत्रक मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी १५ दिवसांच्या आत जाहीर करावे.
निधी परत पाठवणे थांबवा: कोणत्याही राजकीय द्वेषापोटी शहराच्या विकासासाठी आलेला निधी परत पाठवला जाऊ नये.
उपोषण व तीव्र आंदोलनाचा इशारा: येत्या १५ दिवसांत प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आणि कामांना प्रत्यक्ष सुरुवात न केल्यास नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्यात येईल.
या पत्रकार परिषदेत गटनेते अमोल कुतवळ नगरसेवक रणजीत इंगळे नगरसेवक आनंदा जगताप नगरसेवक परमेश्वर कदम चिन्मय मगर किरण कदम, सुदर्शन वाघमारे इत्यादी मान्यवर आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या आगामी भूमिकेकडे आता संपूर्ण तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.








