Best News Portal Development Company In India

काळेगावच्या जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे स्थलांतर!

काळेगावच्या जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे स्थलांतर!
भेगाळलेल्या भिंती, पावसात शाळेत साचते पाणी; धोकादायक अंगणवाडीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

तुळजापूर प्रतिनिधी :-देशभरात शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यावर भर दिला जात असताना तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. शाळेच्या इमारतीची वर्षानुवर्षे दुरुस्ती न झाल्याने भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या असून काही खोल्यांची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. परिणामी, आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेचा आणि भवितव्याचा विचार करून ग्रामस्थांनी मुलांना इतर गावांतील शाळांमध्ये पाठविण्यास सुरुवात केली आहे.

काळेगावची लोकसंख्या सुमारे १२०० असून गावात जवळपास ८०० मतदार आहेत. काही वर्षांपूर्वी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुमारे २०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, शाळेच्या इमारतीची होत असलेली दुरवस्था, अपुऱ्या सुविधा आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळे विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. सध्या इतर गावांतील शाळांच्या तब्बल चार बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी काळेगावात येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

या प्रकारामुळे तुळजापूर तालुक्यातील शिक्षण विभाग जेन अल्फा चा आंदोलनाची वाट पाहत आहे का असा आरोपग्रामस्थातून केला जात आहे
शाळेसाठी दोन नवीन खोल्या बांधण्यात आल्या आहेत. यातील एका खोलीत शाळेचे कार्यालय तर दुसऱ्या खोलीत प्रत्यक्ष वर्ग भरविला जातो. मात्र, उर्वरित तीन खोल्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या खोल्यांच्या मागील बाजूच्या खिडक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. भिंतींना ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून त्या कधी कोसळतील, याचा नेम नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळेला योग्य कंपाऊंड नसल्याने शाळेच्या आवारात जनावरांचा वावरही होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण मिळण्याऐवजी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

पावसाळ्यात शाळेच्या आवारात पाण्याचा डोह
गावातील सांडपाणी थेट शाळेच्या परिसरात येऊन साचत असल्याने पावसाळ्यात शाळेच्या आवारात पाण्याचा डोह तयार होतो. विद्यार्थ्यांना या पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागते. सांडपाण्याचा निचरा करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अंगणवाडीचीही अवस्था धोकादायक
शाळेच्या परिसरातील अंगणवाडीची अवस्थाही चिंताजनक आहे. अंगणवाडीची संरक्षक भिंत जीर्ण झाल्याने त्या कधी कोसळतील, याचा भरवसा नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अंगणवाडी परिसरात सातत्याने सापांचा वावर असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे

शाळेच्या परिसरात सांडपाणी आणि पावसाचे पाणी साचत असल्याने शाळा बांधकाम खालील जमीन भरून घेऊन अथवा विद्यमान शाळेच्या जागेचे उंचीकरण करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वर्गखोल्यांची संख्या वाढविण्याचीही मागणी होत आहे.

शाळेच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थ अक्षय भोवळे यांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. त्यांच्या पाठपुराव्याची आता दखल घेतली जात असल्याचे समजते. मात्र, प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम कधी सुरू होणार आणि नवीन इमारत अथवा आवश्यक सुविधा कधी उपलब्ध होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

काळेगाव हे तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरील तालुक्याच्या शेवटच्या टोकाकडील गाव असल्याने शासनाच्या विविध मूलभूत सुविधांचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची ग्रामस्थांची भावना आहे. ग्रामसेवकाच्या उपलब्धतेबाबतही ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात असून विविध कागदपत्रांच्या कामांसाठी त्यांना तुळजापूरला हेलपाटे मारावे लागत असल्याचे सांगण्यात येते.

विकासकामांची चौकशी करण्याचीही मागणी
गावातील शाळा व इतर विकासकामांसाठी यापूर्वी करण्यात आलेल्या खर्चाची आणि कामांची तपासणी करण्याची मागणीही आता पुढे येत आहे. सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय कारभार असल्याने ग्रामस्थांनी आपल्या समस्या नेमक्या कोणाकडे मांडाव्यात, असा प्रश्न निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

अन्यथा शाळा विद्यार्थीविना होण्याची भीती
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेचे काळेगाव येथील शाळा हे बोलके उदाहरण ठरत आहे. एका बाजूला शिक्षणाच्या सोयी-सुविधांबाबत मोठ्या घोषणा होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना सुरक्षित इमारत, स्वच्छ परिसर आणि मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर पालकांनी आपल्या मुलांना इतरत्र पाठविण्याशिवाय पर्याय काय, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

काळेगावच्या जिल्हा परिषद शाळेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देणे, धोकादायक खोल्यांची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करणे, शाळेचे उंचीकरण, सांडपाणी निचरा, कंपाऊंड व अंगणवाडीची सुरक्षितता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा येत्या काळात काळेगावची जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे आता काळेगावकरांचे लक्ष लागले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india