कैलास पाटलांच्या विश्वासघातामुळे भाजपात प्रवेश; संजय मुंदडांचा घणाघाती आरोप!
तुळजापूर प्रतिनिधी ;- विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कोणतीही साधनं नसताना आम्ही जीवाचं रान करून कैलास पाटील आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासाठी शहरात मतं मिळवली. मात्र नगर परिषद निवडणुकीच्या वेळी याच लोकांनी आमच्याकडे अक्षरशः पाठ फिरवली. ज्यांच्यासाठी आम्ही संघर्ष केला, त्यांनीच वेळ आली तेव्हा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं.
उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात शिंदे गटाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी उघडपणे प्रयत्न केले, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातलं गेलं. त्यांना गोंजारलं गेलं आणि त्यांच्याच भूमिकेला पूरक अशी भूमिका घेतली गेली. हा केवळ आमचा विश्वासघात नाही, तर थेट उद्धव साहेबांच्या नेतृत्वाशी आणि शिवसैनिकांच्या विश्वासाशी केलेली गद्दारी आहे.
नगर परिषद निवडणुकीनंतर शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वारंवार अपेक्षा ठेवली; पण आमदार म्हणून आमच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं गेलं नाही. कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही. मग ज्यांनी मतदारांचा, नगरसेवकांचा आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला, त्यांच्यासोबत आम्ही का राहायचं?
याउलट युवा नेते मल्हारदादा पाटील यांनी आमच्या समस्या समजून घेतल्या, त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली. फरक स्पष्ट आहे,एकीकडे कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवणारे नेतृत्व आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व.
आम्ही आजपर्यंत टीका-टिप्पणी केली नाही. आमदार राणादादांचा निरोप होता की कोणालाही काही बोलू नका; म्हणून आम्ही संयम ठेवला आणि गप्प राहिलो. पण आता तुम्हीच सुरुवात केली आहे, तर आम्हालाही सत्य बोलावं लागेल.
आता निर्णय झाला आहे. विश्वासघाताच्या राजकारणाला उत्तर विकासाच्या आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या राजकारणाने देणार.
युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्या नेतृत्वात उबाठाचे शहरातील शेकडो कार्यकर्ते लवकरच भाजपात प्रवेश घडवून आणणार आहोत.






