धक्कादायक! पराभवाच्या रागातून जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर काठ्या-कुऱ्हाडींसह हल्ला; धाराशिवमध्ये राजकीय खळबळ! तुळजापूर प्रतिनिधी :- भाजप जिल्हा चिटणीस दयानंद शिंदे यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; तात्काळ पोलीस संरक्षणाची मागणी.
निवडणुकीतील पराभव सहन न झाल्यामुळे राजकीय वैमनस्यातून जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर २० ते २५ जणांच्या टोळीने कुऱ्हाड आणि घातक हत्यारांसह हल्ला घडवून आणल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा चिटणीस दयानंद मनोहर शिंदे यांनी पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे धाव घेत जीवाला धोका असल्याचे सांगून तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद मनोहर शिंदे (रा. मसला खुर्द, ता. तुळजापूर) हे जिल्हा परिषद निवडणुकीत काक्रंबा गटातून निवडून आले आहेत. याच निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश बाबुराव भिसे (रा. काक्रंबा) यांचा पराभव झाला होता. या पराभवाचा राग मनात धरून राजकीय दुष्मनीपोटी सुरेश भिसे, अमोल बाबुराव भिसे, चंद्रकांत बाबुराव भिसे व त्यांचे नातेवाईक आणि सुमारे २० ते २५ गावगुंड फॉर्च्युनर गाडी व अन्य वाहनांतून दयानंद शिंदे यांच्या मसला खुर्द येथील निवासस्थानी धडकले.
दुपारी १२ ते १२:३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. आलेल्या टोळीच्या हातात काठ्या, कुऱ्हाड यांसारखी प्राणघातक शस्त्रे होती. शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या उद्देशानेच ही टोळी घरात घुसल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
कुटुंब दहशतीखाली; जीवाला गंभीर धोका!
या घटनेमुळे शिंदे यांच्या घरात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. “माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास सुरेश बाबुराव भिसे व त्यांची टोळीच पूर्णपणे जबाबदार असेल,” असा गंभीर इशाराही शिंदे यांनी पत्राद्वारे दिला आहे.
कठोर कारवाईची आणि संरक्षणाची मागणी
घटना घडल्यानंतर दयानंद शिंदे यांनी पोलीस ठाणे तामलवाडी येथे तक्रार दाखल केली असून, पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांच्याकडे लेखी अर्ज दिला आहे. या अर्जाची प्रत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), पोलीस उपअधीक्षक (तुळजापूर), पोलीस निरीक्षक (तुळजापूर) आणि पोलीस निरीक्षक (तामलवाडी) यांनाही पाठवण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि दयानंद शिंदे यांना पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.







