Best News Portal Development Company In India

बेकायदेशीर परप्रांतीय बस वाहतुकीवर मनसे आक्रमक; धाराशिव RTO ना निवेदनाद्वारे १५ दिवसांचा अल्टीमेटम!

बेकायदेशीर परप्रांतीय बस वाहतुकीवर मनसे आक्रमक; धाराशिव RTO ना निवेदनाद्वारे १५ दिवसांचा अल्टीमेटम!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि गुजरात यांसारख्या इतर राज्यांत नोंदणी झालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स आणि टुरिस्ट बसद्वारे धाराशिव जिल्ह्यात नियमबाह्य व बेकायदेशीर व्यवसाय केला जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), धाराशिव यांना निवेदन देऊन अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे.
​शासनाचा महसूल बुडवून स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय
​RTO अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मनसेने नमूद केले आहे की, बाहेर राज्यातील अनेक ट्रॅव्हल्स धाराशिव जिल्ह्यात येऊन सर्रास प्रवासी वाहतूक करत आहेत. कायद्यानुसार ३० दिवसांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र राज्यातील नोंदणी बंधनकारक आहे. असे असतानाही या वाहनांकडून:
​महाराष्ट्र राज्याचा रोड टॅक्स व परमिट फी बुडवली जात आहे.
​स्थानिक प्रवाशांकडून अवैध भाडेवसुली करून राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे.
​नियमांचे उल्लंघन करून स्थानिक महाराष्ट्रीयन ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा आणली जात आहे.
​मनसेच्या प्रमुख मागण्या:
​तातडीने तपासणी: जिल्ह्यातील सर्व प्रमुख बसस्थानके, हॉटेल्स आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये परप्रांतीय व्यावसायिक वाहनांची तात्काळ विशेष मोहीम राबवून तपासणी करावी.
​दंड व जप्ती: कर न भरता व बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ती तात्काळ जप्त करण्यात यावीत.
​प्रवासी चढ-उतारास बंदी: अशा वाहनांना धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवासी चढ-उतार करण्यास पूर्णपणे बंदी घालावी.
​कारवाईचा अहवाल: या विषयावर RTO प्रशासनाने केलेल्या कारवाईचा साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध करावा.
​१५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
​महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि स्थानिक व्यावसायिकांचे हित जपण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची दखल घेऊन आगामी १५ दिवसांत प्रशासनाकडून लेखी उत्तर व ठोस कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला.
​निवेदन सादर करताना मनसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, तालुका सचिव धनाजी साठे, शहर उपाध्यक्ष समीर शेख, राहुल गायकवाड यांच्यासह अनेक मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india