ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी उमेद; कांता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप
कसगी, दि. 25 ऑगस्ट 2026 : ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक अडचणीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने कांता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसगी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चनपटणे नगर कसगी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसगीवाडी या तीन शाळांमध्ये शाळेच्या बॅगा व शालेय शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
कांता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक श्री. धनराज जाधव व सचिव सौ. नूपुर जाधव यांच्या सौजन्याने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. तिन्ही शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामागे संस्थापक धनराज जाधव यांची प्रेरणादायी भावना आहे. त्यांच्या बालपणी शाळेत जाण्यासाठी बॅग उपलब्ध नसल्याने पोत्याची पिशवी वापरावी लागत होती. आपल्या बालपणीची ही परिस्थिती ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना येऊ नये, या भावनेतून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅगा व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. या संकल्पातून आतापर्यंत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना “शिक्षणापासून वंचित राहू नका, मन लावून शिका आणि मोठे व्हा” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. तसेच भविष्यातही शेतकरी कुटुंबातील व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शक्य तेवढी मदत करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“विद्यार्थ्यांच्या हातातील शैक्षणिक साहित्य हे केवळ वस्तू नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यातील पहिली पायरी आहे. परिस्थिती कोणतीही असो, प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून शिक्षणाच्या माध्यमातून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाला श्री. धनराज जाधव यांचे बंधू श्री. भगवान शामराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री. शमशोद्दीन जमादार, सरपंच मुरळी; श्री. हणमंत गुरव, सरपंच ग्रा.पं. कसगी; मुख्याध्यापक गुरव सर; चेअरमन सिद्धाराम सुंटनुरे; श्री. मुबारक मोजणीदार, तंटामुक्त उपाध्यक्ष मुरळी; श्री. मल्लिनाथ मुलगे, तंटामुक्त अध्यक्ष कसगी; सायबा सोनकांबळे, ग्रामपंचायत सदस्य; श्री. अरुण पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष मुरळी यांच्यासह भरत जाधव, शीतल पाटील, विश्वंभर सुरवसे, पुरुषोत्तम पिंपळे, बालाजी चौधरी, श्याम चौधरी, संभाजी कलबुर्गे, बालाजी पाटील, सूरज जाधव, सागर येवते, बबन पाटील, राजू पाटील, संकेत गायकवाड, भीम चौधरी, विवेकानंद चौधरी, प्रशांत चौधरी, दीपक बिराजदार, फुरकान पटेल, हसन मोजणीदार, इस्माईल पटेल, मुस्ताक जमादार, इलाही तांबोळी, बसवेश्वर निंबरगे, ज्ञानेश्वर बेळे तसेच शाळेतील शिक्षक-शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते.
कसगी गावचे सरपंच, शालेय समितीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व शिक्षकवृंद यांनी कांता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक धनराज जाधव व सचिव नूपुर जाधव यांच्या या सामाजिक विचाराचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. तसेच ट्रस्टच्या पुढील सेवाभावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कांता चॅरिटेबल ट्रस्ट मुरळी, कदेर व कंटेकुर येथील सर्व सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले. सर्वांच्या सहकार्याने हा सेवाभावी उपक्रम उत्साहपूर्ण आणि सुंदर वातावरणात पार पडला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देत, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचा कांता चॅरिटेबल ट्रस्टचा हा उपक्रम निश्चितच शिक्षणासाठी प्रेरणादायी आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखविणारा ठरत आहे.








