*‘एआय मानवासाठी तारक की मारक?’ विषयावर उमरग्यात वाद-विवाद स्पर्धा*
*ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन व जि. प. हायस्कूलचा संयुक्त उपक्रम; विजेत्यांना रोख पारितोषिकांसह स्मृतीचिन्ह*
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा आणि जिल्हा परिषद हायस्कूल, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मानवासाठी तारक की मारक?’ हा स्पर्धेचा विषय असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे, वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने यावर विद्यार्थी आपली मते मांडणार आहेत.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण, आरोग्य, उद्योग, संशोधन, प्रशासनासह दैनंदिन जीवनाच्या विविध क्षेत्रांत वेगाने प्रवेश करत आहे. एकीकडे एआयमुळे मानवी जीवन अधिक सुलभ व कार्यक्षम होत असताना दुसरीकडे रोजगार, गोपनीयता, तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व आणि त्याचा गैरवापर यासारखे प्रश्नही उपस्थित होत आहेत. या विषयाच्या दोन्ही बाजूंचा विद्यार्थ्यांनी चिकित्सक पद्धतीने विचार करावा, त्यांच्यात अभ्यास, वैचारिक मांडणी व वक्तृत्व कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत प्रत्येक शाळेचा अनुकूल व प्रतिकूल बाजू मांडणारा संघ सहभागी होईल. प्रत्येक विद्यार्थ्याला आपले विचार मांडण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेने स्पर्धेसाठी स्पर्धकांची आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
स्पर्धेतील सांघिक प्रथम क्रमांक विजेत्या संघाला स्मृतीचिन्ह व रोख २१०० रुपये, द्वितीय क्रमांकाला स्मृतीचिन्ह व रोख १५०० रुपये, तर तृतीय क्रमांकाला स्मृतीचिन्ह व रोख १२०० रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व शाळांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते
२ या वेळेत जिल्हा परिषद प्रशाला, उमरगा येथे होणार आहे. उमरगा परिसरातील शाळांनी विद्यार्थ्यांचे संघ या स्पर्धेत सहभागी करून विद्यार्थ्यांना आपले विचार आणि वक्तृत्व कौशल्य सादर करण्याची संधी द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






